बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २२ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 03:29 PM2018-08-24T15:29:31+5:302018-08-24T15:43:25+5:30
राज्य मंडळाचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आला. यंदाच्या पुरवणी परीक्षेच्या निकालामध्ये २ टक्क्यांनी घट झाली आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल २२.६५ टक्के इतका लागला आहे. परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या १ लाख २ हजार १६० विद्यार्थ्यांपैकी केवळ २३ हजार १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्य मंडळाचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आला. यंदाच्या पुरवणी परीक्षेच्या निकालामध्ये २ टक्क्यांनी घट झाली आहे. जुलै २०१७ मध्ये २४.९६ टक्के तर जुलै २०१६ मध्ये २७.०३ टक्के निकाल लागला होता. बारावीच्या एकूण १३१ विषयांची परीक्षा घेण्यात आली. राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे, प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी हा निकाल जाहीर केला आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.
बारावीमध्ये निकाल लागल्यानंतर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी गेल्या ३ वर्षांपासून आॅक्टोबर ऐवजी जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जात आहे. विभागनिहाय पुणे २०.७७, नागपूर २५.५१, औरंगाबाद २८.५०, मुंबई १९.२७, कोल्हापूर २५.९४, अमरावती २१.४४, नाशिक २२.३२, लातूर ३१.४८, कोकण १९.७५ असा निकाल लागला आहे.
विद्यार्थ्यांना या परीक्षेत मिळालेल्या गुणांची पडताळणी करावयाची असल्यास दि. २७ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये अर्ज करता येणार आहे.