चलन नसल्याने मजुरी म्हणून देतात धान्य
By Admin | Published: November 19, 2016 03:21 AM2016-11-19T03:21:30+5:302016-11-19T03:21:30+5:30
सरकारने पाचशे व हजाराच्या नोटांची चलनबंदी केल्याने ऐन कापणीच्या मोसमात मजुरी कशी देणार.
सुनील घरत,
पारोळ- सरकारने पाचशे व हजाराच्या नोटांची चलनबंदी केल्याने ऐन कापणीच्या मोसमात मजुरी कशी देणार. त्यातच बॅँकांच्या व एटीएमच्या बाहेर लांबचलाब रांगा असल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, यावर पारंपरिक वस्तू विनिमय पद्धतीच्या आधारे तोडगा काढून मजुरांना मजुरी म्हणून धान्य देण्याचा तोडगा बळीराजाने काढला आहे.
पूर्ण हंगाम घामाने व काबाडकष्टाने राबून कापणीनंतर हाती लागलेल्या पिकाची झोडणी करून घरात लवकर आणण्यासाठी वसईतील बळीराजाची लगबग सुरु आहे. वसई पूर्व ग्रामीण भागात जिकडे तिकडे आपापल्या शेतात बनवलेल्या खळ्यामध्ये पहाटेपासून झोडणीची व वाढवणीची कामे सर्वत्र सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, मजूर टंचाईमुळे प्राप्त मजुरांच्या शोधात बळीराजा हैराण झाला आहे. त्यातही मिळणाऱ्या मजुरांना मजुरी देण्यासाठी सुट्टे चलन नाही. यावर तोडगा म्हणून मजुरीच्या बदल्यात धान्य अथवा उधारीने मजूर काम करत आहेत. चलन अडचणीच्या काळामध्ये झोडणीची घाई का करता, असे विचारले असता शेतकरी सांगत आहेत की, पुढे सुरु होणाऱ्या रब्बी हंगामात ही कामे शिल्लक राहिली आणि यांना वेळ दिला तर शेतातील ओल निघून जाईल व द्विदल पिके उशिरा पेरल्याने पिके पाहिजे तशी होणार नाहीत म्हणून आम्ही घाई करत आहोत. असे सांगितले.
>व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट
वसईत भातखरेदी केंद्र होणार, ही घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात वसईत भातखरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतीचा भात पिकाला खाजगी व्यापारी कमी दर देत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
सरकारी दर, उच्च प्रतीच्या भात, पिकाला प्रतिक्विंटल १५१० रुपयांचा दर असून व्यापारी मात्र ११०० ते १२०० च्या घरात खरेदी करतात.