नोटा बदलाचा पर्यटन स्थळावर परिणाम

By admin | Published: November 13, 2016 05:30 PM2016-11-13T17:30:32+5:302016-11-13T17:30:32+5:30

केंद्र सरकारच्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा परिणाम राज्यातील पर्यटन स्थळांवरही जाणवत आहे

The result of the notable change tourism | नोटा बदलाचा पर्यटन स्थळावर परिणाम

नोटा बदलाचा पर्यटन स्थळावर परिणाम

Next

ऑनलाइन लोकमत/ब्रह्मानंद जाधव
बुलडाणा, दि. 13 - केंद्र सरकारच्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा परिणाम राज्यातील पर्यटन स्थळांवरही जाणवत आहे. पर्यटन स्थळाच्या परिसरात ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केल्याने पर्यटकांच्या संख्येत घट झाली असून सुट्टीच्या दिवसातही पर्यटनस्थळी शुकशुकाट दिसून येत आहे. 
राज्यातील विविध धार्मिक स्थळे ऐतिहासिक महत्वाची ठिकाणे, समुद्र किनारे, डोंगरदऱ्या आणि जंगले या ठिकाणी दिवाळीच्यानंतर व सुट्टीच्या दिवसात पर्यटकांचा ओघ वाढतो. पश्चिम विदर्भातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा कंबर कसली आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम या जिल्ह्यांसाठी महामंडळाने अमरावती येथे गतवर्षी प्रादेशिक कार्यालय स्थापन केले असून त्या कार्यालयामार्फत महामंडळाच्या विविध योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये निवास व न्याहारी योजना, महाभ्रमण योजना यांसारख्या विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांमुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे.  पर्यटकांचा ओघ फक्त काही हंगामापुरता असतो, त्यामुळे यावर्षी दिवाळीपासून राज्यातील विविध तीर्थस्थाने, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक महत्वाची ठिकाणे, समुद्र किनारे, डोंगरदऱ्या आणि जंगले या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढला होता. परंतू ८ नोव्हेंबर रोजी अचानक केंद्र सरकारने ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे  ८ नोव्हेंबरला रात्रीपासूनच पर्यटन स्थळाच्या परिसरात ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद झाले. परिणामी पर्यटन स्थळावर असलेल्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद न घेताच माघारी परतावे लागले. राज्यातील सर्वच पर्यटनस्थळी ५०० व एक हजार रुपये घेतले जात नसल्याने दुरवरून आलेल्या पर्यटकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. नोटा बंदच्या या निर्णयाने सध्या पर्यटन स्थळावरील पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. एैन सुट्टीच्या काळात पर्यटकांची संख्या घटल्याने पर्यटन स्थळ परिसरातील व्यावसायीकांना मोठा फटका बसला आहे.  

सुट्टीचा हंगाम गेला खाली

पर्यटन स्थळावर पर्यटकांचा ओघ फक्त काही हंगामापुरताच राहतो. ११ नोव्हेंबरला कार्तिक मासातील एकादशी असल्याने या दिवशी राज्यातील विविध तीर्थस्थाने व धार्मिक स्थळी गर्दी राहील असा अंदाज होता; मात्र  ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बंदमुळे धार्मिक स्थळी कार्तिक एकादशीला भाविकांची संख्या कमी दिसून आली. त्यानंतर १२ नोव्हेंबरला महिन्यातील दुसरा शनिवार, १३ नोव्हेंबरला रविवारची साप्ताहीक सुट्टी व १४ नोव्हेंबरला   गुरूनानक जयंतीची सुट्टी अशाप्रकारे तीन दिवस सलग सुट्टी येऊन सुद्धा पर्यटन स्थळावर पर्यटकांचा ओघ वाढत नसल्याचे दिसून येत आहे. 

५०० किंवा एक हजार रुपयांचीच खरेदी करा !

केंद्र सरकारचा ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्दचा निर्णय धडकताच पर्यटन स्थळावर आलेल्या पर्यटकांची मोठी अडचण निर्माण झाली. पर्यटनस्थळाच्या परिसरातील व्यावसायिकांकडून पर्यटकांना ५०० किंवा एक हजार रुपयांचीच खरेदी करण्याचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे १०० रुपयांच्या वस्तूसाठी पर्यटकांना ५०० रुपयांची खरेदी करावी लागत आहे. 

Web Title: The result of the notable change tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.