अडीच टक्क्यांनी निकाल घटला
By Admin | Published: June 7, 2016 07:30 AM2016-06-07T07:30:31+5:302016-06-07T07:32:03+5:30
उस्मानाबाद : उस्मानाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेत उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल
उस्मानाबाद : उस्मानाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेत उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८५़६२ टक्के लागला आहे़ मागील वर्षी जिल्ह्याचा निकाल ८८़४७ टक्के लागला होता़ हा निकाल पाहता मागच्या वर्षीपेक्षा यंदा २़६० टक्क्यांनी जिल्ह्याचा निकाल घटला आहे़ दरम्यान, मुलींनी यंदाही बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८८़३८ टक्के आहे़
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परिक्षेसाठी जिल्ह्यातील २३ हजार २८१ विद्यार्थ्यांनी दहावीच्या अर्ज दाखल केला होता़ यातील २३ हजार १८५ विद्यार्थ्यांनी मार्चमध्ये परिक्षा दिली़ यात १२ हजार ४६९ मुले तर १० हजार ६५६ मुलांचा समावेश होता़ यातील १९ हजार ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ८५़६२ टक्के लागला आहे़ यात १० हजार ३८१ मुले व ९ हजार ४१८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत़ मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ही ८८़३८ टक्के तर मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८३़२५ टक्के आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक निकाल ९२़३४ टक्के भूम तालुक्याचा लागला आहे़ उस्मानाबाद तालुक्याचा ८५़३७ टक्के, कळंब- ७९़७१ टक्के, लोहारा ८६़३१ टक्के, उमरगा ८६़४७ टक्के, परंडा ९०़३७ टक्के, तुळजापूर ८४़३५ टक्के तर वाशी तालुक्याचा निकाल हा ८१़२१ टक्के लागला आहे़ तालुकानिहाय निकालांमध्येही सर्व तालुक्यात मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे़ शहरातील नेट कॅफे, शाळा- महाविद्यालयासह शासकीय कार्यालयांमध्येही आपाली पाल्ये, नातेवाईकांच्या पाल्यांचा निकाल पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले़ निकाल लागल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींनी मोठा जल्लोष केला़
रिपीटरचाही टक्का घसरला
मागील वर्षी रिपिटर विद्यार्थ्यांचा निकाल ५३़०३ टक्के लागला होता़ यंदा मात्र, रिपिटरचा निकाल ४१़०५ टक्के लागला आहे़ रेग्युलर प्रमाणेच रिपीटर परिक्षार्थींचाही निकाल यंदा घसरला आहे़ यात उस्मानाबाद तालुक्याचा २८़८६ टक्के, भूम तालुक्याचा १५ टक्के, कळंब २८ टक्के, लोहारा ७३़२ टक्के, उमरगा ३४़६७ टक्के, परंडा ५० टक्के, तुळजापूर ४८़१३ टक्के, वाशी तालुक्याचा २८़५७ टक्के निकाल लागला आहे़
विभागात जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर
लातूर विभागाचा ८१़५४ टक्के निकाल लागला आहे़ लातूरने नेहमीप्रमाणे विभागात आघाडी मारली असून, लातूरचा निकाल ८६़५४ टक्के लागला आहे़ त्या पाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्याचा ८५़६२ टक्के निकाल लागला आहे़ तर नांदेड जिल्ह्याचा ७४़४८ टक्के निकाल लागला आहे़
विशेष प्राविण्यासह ५४५१ विद्यार्थी उत्तीर्ण
जिल्ह्यातील १९ हजार ७९९ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत़ यात ५ हजार ४५१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत़ तर प्रथम श्रेणीत ७ हजार ६१८, द्वितीय श्रेणीत ५ हजार ५३८, तर पास श्रेणीत १ हजार १९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़
पाचव्या वर्षीही भूम आघाडीवर
मागील चार वर्षापासून भूम तालुक्याने जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे़ सन २०११-१२ या शैक्षणिक वर्षात भूम तालुक्याचा ७६़०८ टक्के, शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मध्ये ८४़३५ टक्के, शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये ९१़११ टक्के निकाल लागला होता़ तर शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये ९४़६७ टक्के निकाल लागला होता़ तर शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये ९२़३४ टक्के निकाल लागला आहे़ भूम तालुक्याने सलग पाचव्या वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक निकालाची परंपरा कायम राखली आहे़