अंड्यावर वाढत्या तापमानाचा परिणाम
By admin | Published: April 28, 2017 02:40 AM2017-04-28T02:40:34+5:302017-04-28T02:40:34+5:30
गेल्या काही वर्षांत वातावरणात अनेक बदल झाले आहेत. त्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नैसर्गिक गोष्टींवर झालेला पाहायला मिळतो.
मुंबई : गेल्या काही वर्षांत वातावरणात अनेक बदल झाले आहेत. त्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नैसर्गिक गोष्टींवर झालेला पाहायला मिळतो. वाढत्या तापमानामुळे अन्नधान्याचा दर्जा खालावलेला पाहायला मिळतो. याचेच अजून एक उदाहरण म्हणजे सध्याचा चर्चेतला विषय कृत्रिम अंडी. बाजारात कृत्रिम प्लॅस्टिकची अंडी आल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यामुळे घबराट पसरली. पण, बाजारात कृत्रिम अंडी आलेली नसून वाढत्या तापमानाचा परिणाम अंड्यावर होत असून, त्यामुळे त्यात बदल झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
काही दिवसांपूर्वी कोलकाता, डोंबिवली, भांडुप, विक्रोळी आणि चीनमध्येही कृत्रिम अंडी बाजारात आल्याचे वृत्त पसरले. नेहमीच्या अंड्यापेक्षा ही अंडी वेगळी दिसतात. तसेच ती लवकर फुटत नाहीत, आतला पांढरा आणि पिवळा बलक प्लॅस्टिकसारखा दिसतो. ही अंडी प्लॅस्टिकसारखी दिसत असल्याने बाजारात प्लॅस्टिकची अंडी आली आहेत, या वृत्ताने अनेक जण घाबरले. प्रत्यक्षात मात्र असे अजून सिद्ध झालेले नाही. त्यामुळे ही कृत्रिम अंडी नसून वाढत्या तापमानामुळे अंड्यामध्ये बदल होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (ग्रेटर मुंबई) सुरेश अन्नपुरे यांनी सांगितले.
अन्नपुरे यांनी पुढे सांगितले, मुंबईसह राज्यातील तापमानात वाढ झालेली आहे. या वाढीचा परिणाम अंड्यावर झालेला असू शकतो. लोकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कारण, या वृत्तानंतर एफडीएने मुंबईतून दोन नमुने घेतले आहेत. या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत सुरू आहे. अद्याप अहवाल आलेला नाही. अंड्याचे कवच सच्छिद्र असते, अंड्यामध्ये पोकळी असते. कवचाला असलेल्या छिद्रांमधून बाहेरील हवा अंड्याच्या पोकळीत जाते. हवेमुळे अंड्यातील पांढरा बलक आणि पिवळा बलक यांच्यासह अंड्याच्या आवरणातील पातळ आवरण चिकटते. छिद्र मोठी झाल्यास ही प्रक्रिया वाढते. अंड्यामध्ये प्रोटीन, फॅट असतात. हवा आत गेल्याने हे खराब होऊ शकतात. त्यामुळे हे बलक आणि आवरण चिकटते. यामुळेच अंडी प्लॅस्टिकसदृश दिसू लागतात.
एका तज्ज्ञ व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृत्रिम अंडी तयार करण्याची प्रक्रिया इतकी सोपी नाही. तसेच असे अंडे तयार करण्यासाठी येणारा खर्च हा साधारण ५०० ते हजार रुपये इतका येईल. इतकी महाग अंडी विकली जाणार नाहीत. कृत्रिम आणि इतकी महाग अंडी का तयार करण्यात येतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे तापमानवाढीचा परिणाम होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)