निकालाचा टक्का घसरला
By admin | Published: May 29, 2017 05:04 AM2017-05-29T05:04:27+5:302017-05-29T05:04:27+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल, रविवारी दुपारी १२ वाजता आॅनलाइन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल, रविवारी दुपारी १२ वाजता आॅनलाइन जाहीर करण्यात आला. यंदा ८२.०२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का १.०३ टक्क्यांनी घसरला आहे. या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. बारावीच्या परीक्षेत रक्षा गोपाळ ही देशात पहिली आली असून,भूमी सावंतने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
देशातील त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९५.६२ टक्के लागला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई रिजन आहे. चेन्नई विभागाचा निकाल ९२.६० टक्के आणि दिल्ली विभागाचा निकाल ८८.३७ टक्के लागला आहे. यंदाच्या बारावी परीक्षेत ८७.५० टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून, ७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशात प्रथम आलेल्या नोएडाच्या रक्षा गोपाळ हिने ४९८ गुण मिळविले आहेत, तर भूमी सावंत हिने ४९७ गुणांसह देशात दुसरा क्रमांक पटकवला आहे. तिसरा क्रमांक चंदीगढच्या मन्नत लुथ्रा आणि आदित्य जैन यांनी ४९६
गुण मिळवून पटकावला आहे. २८ मे ते ११ जूनदरम्यान सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ६५ प्राचार्य, प्राध्यापक, समुपदेशकांचा चमू फोनद्वारे समुपदेशन करणार आहे.
मला गणित आणि कॉम्प्युटर सायन्स या दोन्ही विषयांमध्ये प्रत्येकी ९९ गुण मिळाले असून, इंग्रजीमध्ये ९७, रसायनशास्त्र आणि भौतिक शास्त्रात प्रत्येकी ९८ गुण मिळाले आहेत. मी जेईईची परीक्षा दिली असून, ११ जून रोजी असलेल्या निकालाची प्रतीक्षा करत आहे.
- मेहर निगम, विज्ञान शाखा, ९८.२ टक्के (नवी मुंबई)
माझ्या यशात शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. मला रसायनशास्त्र या विषयात पीएच.डी करायची आहे. आयआयटी अथवा टीआयएफआर अथवा आयआयएससीमधून पीएच.डी करायची आहे.
- समिका आनंद, विज्ञान शाखा - ९८ टक्के (मुंबई)
मला लॉ करायचे आहे. मला बिझनेस स्टडिज, अर्थशास्त्र, इंग्रजी, शारीरिक शिक्षण या विषयांमध्ये ९९ गुण मिळाले आहेत.
- मेहक सेठी, वाणिज्य शाखा, ९८.२ टक्के
(नवी मुंबई)
मला अर्थशास्त्र या विषयात पीएच.डी करायची आहे.लहानपणापासूनच मला या विषयात रस होता. त्यामुळे मी वाणिज्य शाखेची निवड केली. या शाखेतही अनेक संधी आहेत.
- साहिल बागवे, वाणिज्य शाखा - ९७ टक्के (मुंबई)