बारावी पुरवणी परीक्षेचा शुक्रवारी निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 08:16 PM2018-08-23T20:16:02+5:302018-08-23T20:22:10+5:30
दहावी व बारावीच्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतली जाते.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. २४) दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे.विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर विषय निहाय गुण पाहता येतील तसेच या माहितीची प्रतही घेता येईल.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून इयत्ता दहावी व बारावीच्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतली जाते. मंडळामार्फत दि. १७ जुलै ते ४ आॅगस्ट या कालावधीत इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दि. २७ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत गुणांची पडताळणी करण्यासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल. तर उत्तरपत्रिकांची छायाप्रत प्राप्त करण्यासाठी दि. २८ आॅगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करावा लागले. दोन्ही अर्जांसोबत आॅनलाईन निकालाची प्रत जोडणे आवश्यक आहे.
परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पाच दिवसांत पुनर्मुल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०१९ मधील परीक्षा द्यायची आहे, अशा पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. तसेच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी गुणसुधार योजनेअंतर्गत संधी उपलब्ध असेल, अशी माहिती राज्य मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
-----
निकालासाठी संकेतस्थळ - www.ZÔhresu’t