सर्व परीक्षांचे निकाल २५ दिवसांत लागणार
By admin | Published: July 6, 2017 05:10 AM2017-07-06T05:10:36+5:302017-07-06T05:10:36+5:30
जून महिना संपल्यावरही उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली नसल्याने मुंबई विद्यापीठाने एकही निकाल जाहीर केलेला नाही.ं राज्यपाल विद्यासागर राव यांनी या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जून महिना संपल्यावरही उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली नसल्याने मुंबई विद्यापीठाने एकही निकाल जाहीर केलेला नाही.ं राज्यपाल विद्यासागर राव यांनी या प्रकरणाची दखल घेत कुलगुरूंची कानउघाडणी केल्यानंतर पुढच्या २५ दिवसांत सर्व निकाल जाहीर करणार असल्याचे बुधवारी मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले. निकाल जाहीर करण्यासाठी सर्व यंत्रणा जोरदार कामाला लागली असून, आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीने वेग घेतला आहे. स्वत: कुलगुरू कलिना कॅम्पसमध्ये उपस्थित असून, जातीने लक्ष घालत आहेत.
यंदा सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतला होता. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली. पण, आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी कंपन्यांचा अत्यल्प प्रतिसाद आल्याने दोनदा ही प्रक्रिया राबवावी लागली. त्यामुळे आॅनलाइन पेपर तपासणी प्रक्रिया उशिरा सुरू झाली. त्यातच प्राध्यापकांना आॅनलाइन तपासणी नवीन असल्याने अडचणी येत होत्या. या सर्व समस्या सोडवताना उत्तरपत्रिकांची तपासणी २० टक्केच पूर्ण झाली आहे. परिणामी, निकाल रखडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्यपालांनी हस्तक्षेप करून निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करावेत, असे आदेश मुंबई विद्यापीठाला मंगळवारी दिले होते. त्यानुसार विद्यापीठात आता निकालांचा धडाका सुरू होणार आहे. दरम्यान, निकालात होणारे अवैध प्रकार रोखण्यासाठी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धत अंमलात आणली आहे. याआधी अभियांत्रिकीसाठी ही पद्धत वापरली जात होती. पण, यंदापासून सर्व अभ्यासक्रमांना लागू केली आहे. त्यामुळे नक्कीच अवैध प्रकारांना आळा बसेल, असा विश्वास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केला.
नियंत्रण कक्ष स्थापन
राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार, आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करून कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षातून कोणत्या विषयाच्या किती उत्तरपत्रिका तपासून झाल्या, उत्तरपत्रिका तपासणीचे काम कसे सुरू आहे, याविषयी सर्व माहिती संकलित केली जात आहे.
त्याचबरोबरीने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत येत असणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि अन्य अडचणी या नियंत्रण कक्षातून सोडवल्या जातात. उत्तरपत्रिका तपासणीची सर्व माहिती संकलित केली जात आहे. सर्व यंत्रणा कार्यरत असून, सर्व निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी काम सुरू असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव (जनसंपर्क) लीलाधर बन्सोड यांनी दिली.