दहावी-बारावीचा निकाल वेळेतच
By admin | Published: May 20, 2015 10:10 PM2015-05-20T22:10:55+5:302015-05-21T00:06:31+5:30
चर्चेला पूर्णविराम : कोकण बोर्डाने स्पष्ट केली भूमिका
सागर पाटील - टेंभ्ये -राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे निकालाबाबतच्या अफवांवर पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव कृष्णकांत पाटील यांनी केले आहे. दहावी, बारावीचा निकाल न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेतच जाहीर होईल, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
सोशल मीडियावरून सध्या दहावी व बारावीच्या निकालाबाबत अनेक पोस्ट वाचायला मिळत आहेत. मात्र राज्य मंडळाकडून निकालाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे दोनही परीक्षांचे निकाल १० जूनपूर्वी जाहीर करणे राज्य मंडळाला बंधनकारक आहे. त्यादृष्टीने निकालाची तयारी सुरु असल्याचे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले. यापूर्वी निकाल जाहीर होण्याच्या तारखा लक्षात घेतल्यास इयत्ता बारावीचा आॅनलाईन निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, तर दहावीचा आॅनलाईन निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. आॅनलाईन निकालाची तारीख आगामी पाच ते सहा दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
कोकण विभागीय मंडळांतर्गत इयत्ता बारावीच्या परीक्षेला ३२ हजार ८० विद्यार्थी, तर इयत्ता दहावीच्या परीक्षेला ४१,५५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. यामध्ये संख्यात्मकदृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी आहे. दोन्ही परीक्षांना प्रविष्ठ झालेले विद्यार्थी व पालकवर्गाला निकालाची उत्सुकता लागली आहे. गतवर्षी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत रत्नागिरीच्या चिन्मयी मटांगे या विद्यार्थिनीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. यावर्षी ही परंपरा कायम राहाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
यावर्षीच्या दहावी व बारावीच्या निकालामध्ये कोकण विभागीय शिक्षण मंडळ राज्यामध्ये अव्वल असेल. कोकण मंडळाच्या स्थापनेपासूनची परंपरा यावर्षीदेखील कायम राहील. विद्यार्थी, शिक्षक व पालक हा शैक्षणिक त्रिकोण कोकणात अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यान्वित असल्याने उज्ज्वल यश मिळविणे कोकण मंडळासाठी कठीण नाही.
- आर. बी. गिरी,
सचिव, कोकण शिक्षण मंडळ.