महाराष्ट्रात अनेक अँटिजन चाचण्यांचे निष्कर्ष चुकीचे; रुग्णसंख्येबाबत शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 06:41 AM2020-07-27T06:41:59+5:302020-07-27T06:42:09+5:30
अचूक निदानासाठी डॉक्टरांचा आरटी-पीसीआर टेस्टवर भर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली/मुंबई : कोरोनासाठी करण्यात येणाऱ्या अँटिजन चाचण्यांच्या चुकीच्या निष्कर्षांमुळे सर्व राज्ये धास्तावली आहेत. अँटिजन चाचणीत संसर्गाची लागण न झाल्याचे निदान होण्याचे प्रमाण मुंबई व महाराष्ट्रात वाढले आहे. त्याच रुग्णांच्या आरटी-पीसीआर चाचणीत मात्र त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान येत आहे. त्यामुळे अँटिजन चाचण्यांच्या चुकीच्या अहवालांवर अवलंबून न राहाता आरटी-पीसीआर चाचणीच्या अहवालावरच विसंबून राहावे, असे महाराष्ट्र, तामिळनाडू आदी कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या राज्यांना वाटू लागले आहे.
मुंबईतील दोन महत्त्वाच्या प्रयोगशाळांतील चाचण्यांच्या आकडेवारीवरून असे दिसून आले की, कोरोना झाला नसल्याचे निदान अँटिजन चाचणीत आलेल्या ६५ टक्के लोकांची आरटी-पीसीआर चाचणी केली असता, त्यातील बहुसंख्य जणांना संसर्गाची बाधा झाली असल्याचे आढळले आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग तपासण्यासाठी अँटिजन चाचणी झाली. पण या चाचण्यांचे निष्कर्षच चुकीचे ठरत असल्याने महाराष्ट्रातील रुग्णस्थितीबाबतही संशय निर्माण झाला आहे. कोरोनाच्या संसगार्पासून मुक्त असलेल्यांची संख्या दिल्लीमध्ये अँटिजन चाचण्यांनंतर वाढली. हे त्या राज्याचे मोठे यश मानले गेले. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती असणे अपेक्षित होते. पण १८ जून ते २१ जुलै या काळात झालेल्या अँटिजन चाचण्यानंतर कोरोनामुक्त ठरविलेले १५ टक्के लोक आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे अँटीजन चाचण्यांविषयीच शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार १८ जून ते २१ जुलै या कालावधीत दिल्लीमध्ये ३.६ लाख लोकांची अँटिजन चाचणी केली. त्यातील फक्त ६ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. ज्यांना कोरोना झाला नसल्याचे निदान होते, त्यांची आरटी-पीसीआर चाचणी झाल्यावर ते कोरोनाग्रस्त असल्याचे सिद्ध झाले होते. असे सुमारे १५ टक्के रुग्ण होते.
अँटीजन चाचण्यांविषयी शंका उपस्थित झाल्याने त्तामिळनाडूमध्ये रोज ११३ रुग्णालयांमध्ये ५० हजार लोकांच्या थेट आरटी-पीसीआर चाचण्याच केल्या जात आहेत. या चाचणीचे पुरेसे संच या रुग्णालयांना देण्यात आल्याचे तामिळनाडूचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन यांनी सांगितले.
बंगळुरूमध्येही साशंकता
बंगळुरूमध्ये २० जुलैपासून अँटिजन चाचणी करण्यास सुरूवात झाली. तेथील प्रयोगशाळांमध्ये आतापर्यंत ८५०० नमुने गोळा झाले असून त्यांचे अहवाल मिळणे अद्याप बाकी आहे. मात्र अँटिजन चाचण्यांचे अहवाल अचूक असतील, याची शक्यता नसल्याने आरटी-पीसीआर चाचणीच्या निष्कर्षांवर अवलंबून राहाणे उत्तम असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
राज्यात ९,४३१ नवे कोरोनाबाधित
महाराष्टÑात आतापर्यंत २ लाख १३ हजार २३८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात ६ हजार ४४ रुग्ण कोविडमुक्त झाले. मात्र अजूनही देशाच्या तुलनेत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आठ टक्क्यांनी कमी आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण रविवारी ६४ टक्क्यांवर आले आहे, मात्र राज्यात हे प्रमाण ५६.७४ टक्के इतके आहे. राज्यात रविवारी ९ हजार ४३१ रुग्ण, तर २६७ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ३ लाख ७५ हजार ७९९ झाली आहे. तर बळींचा आकडा १३ हजार ६५६ वर पोहोचला आहे.
देशात २४ तासांत ४८,६६१ नवे रुग्ण
नवी दिल्ली : देशामध्ये रविवारी कोरोनाचे ४८,६६१ नवे रुग्ण आढळून
आले असून त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या १३,८५,५२२ झाली आहे. त्यात दिलासादायक बाब ही की, कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८,८५,५७७वर पोहोचली आहे.
देशात कोरोनामुळे रविवारी ७०५ जण मरण पावले असून त्यामुळे एकूण बळींची संख्या ३२,०६३ झाली आहे.
कोव्हॅक्सिनचे निष्कर्ष समाधानकारक
रोहतक : येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसमध्ये कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचे निष्कर्ष समाधानकारक आणि उत्साहवर्धक आहेत. ही माहिती संस्थेच्या प्रमुख इन्वेस्टिगेटर सविता वर्मा यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की संस्थेत सहा जणांना ही लस देण्यात आली. देशातील 12 वैद्यकीय संस्थांमध्ये या लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत.