गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला पीएसआय परीक्षेचा निकाल अखेर जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 08:34 PM2019-03-08T20:34:58+5:302019-03-08T20:37:07+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या ६५० जागांसाठी ५ नोव्हेंबर २०१७ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.
पुणे : गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला पोलीस उपनिरीक्षक पदाच्या (पीएसआय) ६५० जागांचा निकाल अखेर शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत रत्नागिरी जिल्हयातील सुमित कल्लप्पा खोत हा राज्यात प्रथम आला आहे. महिलांमधून अश्विनी हिरे या प्रथम आल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या ६५० जागांसाठी ५ नोव्हेंबर २०१७ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर निकाल जाहीर होण्यास मोठा विलंब झाला. परीक्षार्थी उमेदवारांकडून या परीक्षेचा निकाल लवकर लागावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती.
आयोगाकडून २०१७ नंतर २०१८ मध्ये आणखी एक परीक्षा झाली. त्याचबरोबर आता २४ मार्च रोजी पुढची पूर्व परीक्षा जाहीर करण्यात आली होती. पूर्वीच्या दोन परीक्षांचे निकाल प्रलंबित असतानाच पीएसआय पदाची पुढची जाहिरात आली, त्यामुळे ती परीक्षा द्यायची की जुन्या परीक्षांच्या निकालाची वाट पहायची अशी व्दिधा मनस्थिती उमेदवारांची झाली होती. यापार्श्वभुमीवर अखेर नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या पीएसआय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त (पूर्व) परीक्षेसाठी ३ लाख ३० हजार ९०९ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेसाठी १० हजार ३१ उमेदवार पात्र ठरले होते. मुख्य परीक्षा ५ नोव्हेंबर २०१७ रोजी पार पडली. त्यानंतर एक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ३ आॅक्टोबर ते १ डिसेंबर २०१८ या कालावधीमध्ये शारिरीक चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात आली. यासाठी २ हजार ७६३ उमेदवार पात्र ठरले.
महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर सविस्तर निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे, निवड झालेल्या उमेदवारांची गुणांसहीत यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अंतिम निकालात पात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे आॅनलाइन अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे.