पीएसआय पदाच्या प्रलंबित परीक्षेचा निकाल फेब्रुवारी अखेरीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 08:15 PM2019-01-31T20:15:09+5:302019-01-31T20:17:59+5:30
राज्य लोकसेवा आयोगातर्फे 26 एप्रिल 2017 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी महिना अखेरीस जाहीर केला जाईल.
पुणे: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय-2017 ) पदाच्या परीक्षेचा प्रलंबित निकाल येत्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिध्द केला जाणार आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या काही विद्यार्थ्यांची मैदानी परीक्षा घेण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही .त्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य लोकसेवा आयोगातर्फे 26 एप्रिल 2017 रोजी पीएसआय पदाच्या 650,विक्रीकर निरिक्षक पदाच्या 251 आणि सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 107 पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. मात्र,तब्बल दोन वर्षांचा कालावधी होत आला तरीही अद्याप पीएसआय पदाच्या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच 2017 च्या परीक्षेचा निकाल जाहीर न झाल्यामुळे 2017,2018 आणि 2019 मध्ये प्रसिध्द झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या विविध परीक्षेसाठी हेच विद्यार्थी पुन्हा परीक्षेस प्रविष्ट होत आहेत. वेळेवर निकाल प्रसिद्ध झाल्यास काही विद्यार्थ्यांची निवड आयोगाकडून संबंधित पदांसाठी केली जाईल. त्यातून परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल. परिणामी स्पर्धा परीक्षेकडे वळलेल्या नव्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास आणि यश मिळविण्यास अधिक संधी प्राप्त होईल. त्यामुळे आयोगाने लवकरात लवकर पीएसआयसह सर्व परीक्षांचा निकाल लवकर प्रसिध्द करावा,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदाची पूर्व परीक्षा 16 जुलै 2017 रोजी घेण्यात आली.या परीक्षेचा निकाल 3 ऑक्टोबर रोजी जाहीर झाल्यानंतर मुख्य परीक्षा 5 नोव्हेंबर रोजी झाली. मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 3 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर 2018 या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आली.सध्या आयोगाचा कारभार प्रभारी अध्यक्षांकडे असून आयोगाच्या सदस्यांची संख्या कमी आहे.त्यामुळे पीएसआय पदाच्या मैदानी चाचणी घेण्यास विलंब होत आहे.त्यामुळे शासनाने आयोगाच्या सदस्यांच्या संख्येत वाढ करून कामास गती द्यावी,अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
--------------
राज्य लोकसेवा आयोगातर्फे 26 एप्रिल 2017 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी महिना अखेरीस जाहीर केला जाईल.या परीक्षेत पात्र ठरलेल्या काही विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी घेण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.सर्व विद्यार्थ्यांची मैदानी चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निकाल प्रसिध्द होईल.
- चंद्रशेखर ओक ,प्रभारी अध्यक्ष,एमपीएससी