शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
By Admin | Published: May 17, 2017 06:29 PM2017-05-17T18:29:58+5:302017-05-17T18:29:58+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला आहे
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 17 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता पाचवीचा २१.४३ टक्के तर आठवीचा १३.४५ टक्के निकाल लागला आहे. परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.
राज्यात पहिल्यांदाच इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली आहे. यापुर्वी इयत्ता चौथी व सातवीसाठी ही परीक्षा घेतली जात होती. यावर्षी दि. २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षेत विविध बदलही करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. इयत्ता पाचवीच्या परीक्षेसाठी ५ लाख ४५ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ लाख २६ हजार ५९७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यामधील १ लाख १२ हजार ८५६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेचा निकाल २१.४३ टक्के इतका लागला आहे. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी केवळ ५२ हजार ५६७ विद्यार्थी पात्र ठरले असून परीक्षेचा निकाल १३.४५ टक्के लागला आहे. दोन्ही परीक्षांचा सरासरी निकाल १८.०३ टक्के एवढा आहे. राज्यात पाचवी व आठवीतील एकुण १ लाख ६५ हजार ४२३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. विविध तांत्रिक कारणांमुळे ६३६ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
------------------
अंतिम निकाल १५ जुनपर्यंत
विद्यार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निकालाविषयी काही हरकती असल्यास निकालाच्या छायांकित प्रतीसह दि. ३१ मेपर्यंत परिषदेकडे अर्ज करता येणार आहे. तसेच गुणपडताळणी करण्यासाठीही अर्जाची मुदत दि. ३१ मेपर्यंत राहील. आलेल्या हरकतींचा विचार करून दि. १५ जूनपर्यंत अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यावेळी शिष्यवृत्ती कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार, हे स्पष्ट होईल,असे परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी सांगितले.
------------------------------------------------------------
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल
इयत्तापाचवीआठवीएकुण
विद्यार्थ्यांची नोंदणी ५,४५,८८१४,०३,३०१९,४९,१८२
उपस्थिती५,२६,५९७३,९०,८५५९,१७,४५२
गैरहजर१९,२८४१२,४४६३१,७३०
राखीव३७८२५८६३६
पात्र१,१२,८५६५२,५६७१,६५,४२३
अपात्र४,१३,३६३३,३८,०३०७,५१,३९३
पात्रतेची टक्केवारी२१.४३१३.४५१८.०३
---------------------------------------------------------------
संकेतस्थळ - www.mscepune.in
-----------------------------------------------------
निकालात मोठी घट
यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अनुक्रमे ५६.९४ व ४२.९६ टक्के इतका लागला होता. त्यातुलनेत इयत्ता पाचवी व आठवीच्या परीक्षेचा निकाल खुप कमी लागला आहे. पाचवीचा निकाल २१.४३ व आठवीचा १३.४५ टक्के निकाल लागला असून चौथी व सातवीच्या तुलनेत त्यात अनुक्रमे ३५.५१ व २९.५१ टक्के घट झाली आहे. याविषयी बोलताना डेरे म्हणाले, यावर्षी पहिल्यांदाच परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांचे ए, बी, सी, डी असे चार संच तयार करण्यात आले होते. त्यामुळे परीक्षेत गैरप्रकारांना आळा बसला. परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. पुर्वी दोन्ही पेपरमधील गुणांची एकत्रित करून उत्तीर्ण केले जात होते. आता त्यात बदल करण्यात आला असून दोन पैकी एका पेपरमध्ये १५० पैकी ४० गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. तसेच आठवीसाठी २० टक्के प्रश्नांना उत्तरांचे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यामुळे निकालात घट झाल्याचे दिसून येते, असे डेरे यांनी नमुद केले.