आरोग्य भरतीतील तीन परीक्षांचे निकाल रोखले, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती; तक्रारींची दखल घेत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 07:37 AM2021-03-18T07:37:34+5:302021-03-18T07:37:41+5:30
मुंंबई : राज्यात विविध पदांसाठी झालेल्या भरतीत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर परिचारिका, आरोग्यसेवक आणि चालक या तीन पदांच्या ...
मुंंबई : राज्यात विविध पदांसाठी झालेल्या भरतीत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर परिचारिका, आरोग्यसेवक आणि चालक या तीन पदांच्या परीक्षांचे निकाल रोखण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली.
कारपेंटर पदासाठीची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, उर्वरित पदांचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील. काही गैरप्रकार झाले आहेत का, यासंबंधीचा अहवाल मागविण्यात आला असल्याचे टोपे यांनी सांगितले.
लस म्हणजे कवचकुंडलं नाहीत
कोरोनाची लस म्हणजे कवचकुंडलं नाहीत. दोन वेळा लस घेऊनही कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याची उदाहरणे आहेत, असे सांगत मास्कपासून सर्व नियम पाळा असे आवाहन टोपे यांनी केले. राज्याला येत्या तीन महिन्यांत १ कोटी ९७ लाख लोकांचे लसीकरण करायचे आहे. त्यासाठी दररोज २० लाख याप्रमाणे लसी पुरवाव्यात, अशी मागणी आज पंतप्रधानांकडे केली आहे. सध्या कोरोनामुळे रुग्णालयात असलेल्या रुग्णांची संख्या ५ टक्के आहे; तर आयसीयूमध्ये ३.५ टक्के रुग्ण आहेत.
मृत्युदर पूर्वी २.५ टक्के होता, तो आता ०.४ टक्क्यांवर आला आहे. १०० बेड असतील तरच कोविड रुग्णालयासाठी परवानगी देणार ही अट काढून टाका.. ५० बेड असेल तरी परवानगी द्या, अशी मागणी आज पंतप्रधानांकडे राज्याने केली असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.
शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
बुलडाणा : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती याेजना परीक्षा (एनएमएमएस) २१ मार्च राेजी राज्यभरात विविध केंद्रावर हाेणार हाेती. मात्र, महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा २१ मार्च राेजी घेण्याची घाेषणा केली आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता ही परीक्षा ६ एप्रिल राेजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती याेजना परीक्षा (एनएमएमएस) २१ मार्च रोजी राज्यभरात ३७ जिल्ह्यांतील ७६१ उपकेंद्रांवर घेण्यात येणार हाेती. ही परीक्षा इयत्ता आठवीसाठी घेण्यात येते.