सरकारचे मागील सूत्रच कायम ठेवा; खातेवाटपावर शिंदेसेनेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 08:22 AM2024-12-02T08:22:32+5:302024-12-02T08:23:08+5:30
महायुतीचे राज्यातील तीनही पक्षांचे प्रमुख नेते बैठक घेऊन या संदर्भातील निर्णय घेतील, असे शिरसाट यांनी सांगितले.
मुंबई : आम्ही गृहखाते मागितले आहे, नैसर्गिक न्याय म्हणून ते आम्हाला देणे गरजेचे आहे, अशी भूमिका मांडत शिंदेसेनेने गृहमंत्रिपदावरील दावा कायम ठेवला असल्याचे शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितले आहे. आम्ही मागणी केली आणि त्यांनी लगेच खाते दिले असे होत नाही. त्यासाठी बैठक, चर्चा व्हावी लागते. लवकरच महायुतीची बैठक होईल, त्यात खातेवाटपावर चर्चा करण्यात येईल. महायुतीचे राज्यातील तीनही पक्षांचे प्रमुख नेते बैठक घेऊन या संदर्भातील निर्णय घेतील, असे शिरसाट यांनी सांगितले.
शिंदेसेनेचे नेते शंभूराज देसाई म्हणाले की, फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहविभाग होता. त्यामुळे ते सूत्र लागू करावे हे आमचे म्हणणे आहे. पण याबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार चर्चा करून तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी सल्लामसलत करून घेतील.
‘उपमुख्यमंत्रीपद शिंदे यांनी स्वीकारावे’
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे, आम्ही त्यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया शिंदेसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ते रविवारी पाळधी (जि. जळगाव) येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेनेकडे एकदाही गृहखाते नाही
राज्यात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले तेव्हा मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे होते, मात्र गृहमंत्रिपद भाजपकडे होते. त्यानंतर २०१४ साली पुन्हा युतीचे सरकार आले तेव्हा भाजपने मुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपद आपल्याकडे ठेवले होते.
२०१९ ला महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे, मात्र गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे गेले. त्यानंतर २०२२ मध्ये शिंदेंच्या बंडानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये पुन्हा मुख्यमंत्रिपद शिंदेसेनेकडे तर गृहमंत्रीपद भाजपकडे गेले.