गर्दीच्या हंगामासाठी निवृत्त चालकांची मदत
By Admin | Published: June 25, 2016 03:34 AM2016-06-25T03:34:44+5:302016-06-25T03:34:44+5:30
येणाऱ्या काळातील गर्दीचा हंगाम पाहता चालकांची कमतरता भासू नये, यासाठी एसटी महामंडळाने एसटीच्याच निवृत्त चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : येणाऱ्या काळातील गर्दीचा हंगाम पाहता चालकांची कमतरता भासू नये, यासाठी एसटी महामंडळाने एसटीच्याच निवृत्त चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निवृत्त चालकाला दिवसाला ५00 रुपये पगार देण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, कंत्राटी पद्धतीने त्यांना सेवेत ठेवण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
एसटी महामंडळात ३६ हजार ८६४ चालक आहेत. २0१६ च्या मे महिन्यापर्यंत १,२00 ते १,५00 च्या दरम्यान चालक निवृत्त झाले आहेत. एकूणच चालकांची गरज पाहता राज्यात आणखी २ हजार ४७४ चालक लागणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे महामंडळाने एसटीच्याच निवृत्त चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची प्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू केली आहे. ज्याचे वय ५८ वर्षे पूर्ण झालेले आहे, पण ६0 वर्षे झालेले नाही, अशी अट असलेल्या चालकांची भरती केली जात आहे. हे चालक कंत्राटी पद्धतीने एसटीत काम करतील आणि त्यांच्याकडून काम करण्याचे इच्छापत्र लिहून घेतले जात आहे. (प्रतिनिधी)