शेतीच्या वादातून सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचा खून
By Admin | Published: September 7, 2015 12:05 AM2015-09-07T00:05:37+5:302015-09-07T00:05:37+5:30
एकास अटक, खामगाव तालुक्यातील घटना.
खामगाव (जि. बुलडाणा) : शेतीच्या वादातून सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा खून झाल्याची घटना लोणी गुरव येथे ५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.
मोतीराम तुकाराम अहिर हे पोलिस विभागात सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सेवानवृत्त झाल्यानंतर ते खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथे शेती करीत होते. शेतीच्या कारणावरुन त्यांचा गावातीलच गोपाल भीमराव लोणकर (वय ३५) या तरुणासोबत वाद होता. दरम्यान ५ सप्टेंबर रोजी रात्री मोतीराम अहिर घरात झोपले होते. श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्याने त्यांच्या पत्नी कौशल्याबाई पूजेसाठी गावातील मंदिरात गेल्या होत्या. मोतीराम अहिर हे एकटेच असल्याची संधी साधून गोपाल लोणकर याने घरात प्रवेश करुन त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. पूजा आटोपल्यानंतर कौशल्याबाई घरी परतल्या असता त्यांना पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी आले. मात्र, चाकुचे घाव वर्मी लागल्याने अहिर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला . याप्रकरणी मृतकाची पत्नी कौशल्याबाई अहिर यांनी ६ सप्टेंबर रोजी खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी गोपाल भीमराव लोणकर याचेविरुध्द कलम ३0२ भादंविनुसार गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली . पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलिस करीत आहेत.