निवृत्त पोलिसांना देणार पुरस्कार!
By admin | Published: December 19, 2015 02:05 AM2015-12-19T02:05:09+5:302015-12-19T02:05:09+5:30
माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या नावे फाउंडेशनची स्थापना करून मुंबईत पोलीस कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात फाउंडेशन सेवानिवृत्त
मुंबई : माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या नावे फाउंडेशनची स्थापना करून मुंबईत पोलीस कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात फाउंडेशन सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांपासून ते पोलीस कॉन्स्टेबलपर्यंतच्या तीन पोलिसांना टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या हस्ते ‘पोलीस जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात २३ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता हा सोहळा पार पडेल.
इनामदार यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, जिल्हा पोलीस प्रमुख पदांपासून ते पोलीस महासंचालक म्हणजेच आयपीएस अधिकाऱ्यांपैकी १, पोलीस उपनिरीक्षक ते सहायक पोलीस आयुक्त यांच्यापैकी १ आणि पोलीस कॉन्स्टेबल ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांपैकी १ अशा
३ स्तरांवरील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहेत.
यंदाचा पहिलाच पुरस्कार माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग, माजी सहायक पोलीस आयुक्त सॅम पटेल आणि माजी सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील असा तीन स्तरांतील अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. अनुक्रमे १ लाख २५ हजार, १ लाख ११ हजार आणि १ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पदक असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.
बुधवारी पार पडणाऱ्या या सोहळ्याला टाटा यांच्यासोबत पोलीस महासंचालक प्रवीण
दीक्षित, पोलीस आयुक्त अहमद जावेद आणि सुमारे ५०० आजी-माजी पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पोलिसांवरील वाढते हल्ले चिंतेची बाब
आझाद मैदानापासून विधान भवनापर्यंत पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत इनामदार यांनी चिंता व्यक्त केली. एकट्या पोलिसाला आज समुदायाला हाताळताना भीती वाटत असल्याचे चित्र आहे. ही भीती दूर करताना पोलिसांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.