झुंजारचे पुनरागमन!
By Admin | Published: January 24, 2016 12:20 AM2016-01-24T00:20:44+5:302016-01-24T00:20:44+5:30
क्षणभर लक्षात आलं नाही मग लख्ख प्रकाश पडला पूर्वी पाठ्यपुस्तकात मुंबईची चौपाटी म्हटलं की, टिळकांच्या पुतळ्याचं चित्र असायचं. तो पुतळा आणि चौपाटीचं असं एकत्र चित्र
(कलाक्षरे)
- रविप्रकाश कुलकर्णी
प्रत्येकाच्या मनात मुंबईबद्दलची एक प्रतिमा निर्माण झालेली असते. विशेषत: मुंबईपासून फार दूरवर असलेल्यांच्या मनात नक्कीच. त्याला कारणीभूत सिनेमा असेल, पुस्तकं असतील, शालेय पाठ्यपुस्तकांतील धडे असतील. कसं ते सांगतो. बाहेरगावाहून मुंबईला आलेल्यांना मुंबई दाखविण्याची जबाबदारी मुंबईतल्या कुणावर तरी असतेच. तसा प्रसंग माझ्यावर आला. राणीची बाग, गेट वे आॅफ इंडिया, चौपाटी अशी ठरलेली ठिकाणं दाखवून झाली. तेव्हा बरोबरचा म्हणाला, ‘ही चौपाटी ठीक आहे, पण टिळकांची चौपाटी पाहायची आहे...’
क्षणभर लक्षात आलं नाही मग लख्ख प्रकाश पडला पूर्वी पाठ्यपुस्तकात मुंबईची चौपाटी म्हटलं की, टिळकांच्या पुतळ्याचं चित्र असायचं. तो पुतळा आणि चौपाटीचं असं एकत्र चित्र त्या पिढीच्या मनात नक्कीच होतं. त्याचा तो परिणाम होता.
अशाच मुंबई दर्शनात मरिन ड्राइव्ह, राणीचा नेकलेस वगैरे दाखवल्यानंतर भिरभिरत्या नजरेनं शोध घेत कुणी तरी विचारायचं, तो झुंजार महाल कुठे आहे? ही पृच्छा अर्थातच बाबुराव अर्नाळकरांच्या झुंजारमालाच्या रहस्यकथा वाचकाचीच हे वेगळे सांगायची गरजच नसायची. पिवळ्या पानाच्या रहस्यकथा वाचायचं वेड बाबुराव अर्नाळकरांच्या वेगवेगळ्या रहस्यकथामालांनी लावलं हे ज्यांनी अनुभवलं असेल, त्यांनाच हे वेड काय असतं ते कळू शकेल.
आता बाबुराव अर्नाळकर लेखक म्हणून मागे पडलेत, पण पूर्णपणे विस्मृतीत गेले आहेत असं मात्र नाही. अजूनही मनोरमा प्रकाशनचे अनिल फडके, अर्थात ते बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांचे निस्सीम वाचक तर आहेतच, शिवाय त्यांच्या प्रकाशनाचा पाया त्यांनी व्ही.टी. ते कर्जत आणि चर्चगेट ते विरारपर्यंत रहस्यकथा पोचवून केलेला आहे, याचा त्यांना विसर पडलेला नाही. म्हणून अजूनही ते बाबुरावांच्या झुंजार वा काळापहाड कथा नव्याने प्रकाशित करत असतात, पण मनोरमा प्रकाशनच्या या रहस्यकथा ‘व्हाइट प्रिंट’वरच्या आहेत. किंबहुना, फडके यांनीच रहस्यकथा पहिल्यांदा स्वच्छ पांढऱ्याफटक कागदावर आणल्या, पण खरी रहस्यकथा कुठली तर त्याची गुंडाळी करून हाफ पँटच्या खिशातदेखील जी मावू शकते ती! राजहंस प्रकाशनतर्फे बाबुराव अर्नाळकरांच्या निवडक झुंजार कथांचा खंड येतो आहे, ही बातमी आल्यानंतर आज पन्नाशीच्या आसपास असलेल्या रहस्यकथा वाचकांच्या मनाच्या तारा नक्कीच झंकारल्या असतील...
अरे देवा! मी भरकटायला लागलो की काय?
पण हो, अरे देवा! असं म्हणताच झुंजारला पकडण्याचा विडा उचलणाऱ्या इन्स्पेक्टर आनंदरावांची एन्ट्री असायची. तर तो झुंजार आणि त्याची प्रेयसी-पत्नी विजया हे म्हणजे बदमाशांचा कर्दनकाळ. त्यांचा अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त झुंजार महाल हा मरिन ड्राइव्हवरचा. हा महाल किती अत्याधुनिक तर झुंजाररावची गाडी लिफ्टने वर जायची... इन्स्पेक्टर आनंदरावांचं पोलीस स्टेशन म्हणजे गावदेवी पोलीस स्टेशन.
जर गावदेवी पोलीस स्टेशन दिसतं-असतं. आजही आहे, मग झुंजार महाल मरिन ड्राइव्हला असणारच असं वाटलं तर काय चुकलं? अर्थात, ही किमया बाबुराव अर्नाळकर यांच्या लेखणीची. हे वेड किती असावं? त्या काळात ही रहस्यकथा वाचनालयात बहुतेक ठेवलेली नसायची. (अपवाद दादर सार्वजनिक वाचनालयाचा. तिथे दोन रहस्यकथा बाइंड केलेल्या मिळायच्या. कदाचित आजही असतील...) रहस्यकथा मिळायची टपरी वाचनालयात. एके काळी नाक्यानाक्यावर असली टपरी वाचनालयं होती, त्यावर आज कुणाचाही विश्वास बसणार नाही. बाबुराव अर्नाळकरांच्या चार-पाच नव्या रहस्यकथा दरमहा असायच्या. त्यात एखाददुसरी रीप्रिंट असायची. अर्थात, सगळ्यात मागणी झुंजारमाला, काळापहाड आणि मग नंतर इतर सगळ्या...
त्यात पुन्हा फक्त झुंजारमाला किंवा काळापहाड वाचणारे एकनिष्ठ वाचक असायचेच.
मात्र, ललित म्हणजे फडके-खांडेकर. वाचकांच्या लेखी अर्नाळकर म्हणजे अस्पृश्य... नव्हे खांडेकरांनी जाहीरपणे म्हटलं की, रहस्यकथा वाचनामुळे मुलं बिघडतात. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं आपल्या मुलाचं. आपल्या मुलानं आपल्या कोटातून पाच रुपयांची नोट चोरली, ते रहस्यकथा वाचनानं...
तेव्हा र.धों. कर्वे यांनी लिहिलं की, ही चूक अर्नाळकरांची नसून, खांडेकरांनी कोटात नोट ठेवण्याऐवजी सुरक्षित ठिकाणी ठेवायला हवी होती.
अर्थात, या गोष्टीचा बाबुरावांवर फारसा परिणाम झाला नाही. कारण त्यांच्या वाचकांचा पाठिंबा. असे बाबुराव मग लिहीतच राहिले. त्यातल्या काही रहस्यकथा अशा आठवतात, तशा काही गोष्टीदेखील. उदा. रहस्यकथेची मुखपृष्ठं सर्वसाधारणपणे लाल-पांढऱ्या रंगात असत आणि त्या चित्रकारांत रघुवीर मुळगावकरदेखील होते.
झुंजारमालेची मागणी किती, तर एकदा एका रहस्यकथेवर झुंजारचं चित्र आणि चक्क त्यावर त्याची सही! अशा बाबुराव अर्नाळकरांचा फोटो मात्र फारसा कधीच दिसला नाही. छापला तो पुढे अनिल फडके यांनीच. रहस्यकथांच्या मागच्या पानावर.
असा फोटोही त्या काळात न येणाऱ्या बाबुराव अर्नाळकरांचं आत्मचरित्र - ‘वैतरणेच्या तीरावर’ क्रमश: म्हणजे दर महिन्याच्या झुंजार कथेच्या सुरुवातीला येत असे. हे आत्मचरित्र पूर्ण झाल्याचं ऐकिवात नाही. त्याचं काय झालं असेल पुढे?
या रहस्यकथेचे प्रकाशक कोण असतील?
एक नाव नक्की - व्ही.आर. प्रभू म्हणजे बबन प्रभूचे वडील! या नावात ज्यांचं नाव घेतल्याशिवाय ही यादी पूर्ण होऊ शकणार नाही, ते म्हणजे रम्यकथा प्रकाशनचे वासू मेहंदळे! हा एक अजब प्रकाशक होता.
बाबुरावांनी लिहायचं आणि मेहंदळेंनी छापायचं, हे ठरलेलं.
पुढे बाबुराव लिहीत होते, पण मेहंदळेंनी ते छापायचं थांबवलं, पण ठरलेलं मानधन दरमहा मेहंदळे अर्नाळकरांकडे पाठवत राहिले! असं का? अर्नाळकरांचा जमाना ओसरत चालला. छपाईचा खर्चदेखील निघेना असं मेहंदळेंच्या लक्षात आलं. मग मेहंदळे यांनी विचार केला, बाबुरावांच्या रहस्यकथांनी एके काळी धो धो पैसा मिळवून दिला, त्यातला थोडा बाबुरावांकडे गेला, तर बिघडतं कुठं? अशा रहस्यकथा लिहिलेल्या वह्यांची थप्पीच्या थप्पी मेहंदळे यांच्या नारायण पेठेतल्या आॅफिसात होती.
पुढे वासू मेहंदळे यांची वाताहत झाली. त्याबरोबर त्या अर्नाळकरांच्या हस्तलिखितांची पण...
त्यातील काही कथा मला वाटतं वासू मेहंदळेंच्या मुलाने - उमेश मेहंदळेने पुढे प्रकाशित केल्या होता.
ग्रंथ प्रकाशन व्यवसायात असं दुसरं उदाहरण नसेल... बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यमालांच्या लोकप्रियतेमुळे भल्याभल्यांनी रहस्यकथा लिहून पाहिल्या, त्यात मामा वरेरकर, गो.नि. दांडेकर यांच्यापासून ना.सं. इनामदार, शांता शेळके अशी मंडळी दिसतील, पण जे यश बाबुराव अर्नाळकरांना मिळालं, त्याची सर तेव्हा इतर कुठल्याही रहस्यकथाकाराला आली नाही. रहस्यकथा म्हणजे बाबुराव अर्नाळकर आणि अर्नाळकर म्हणजे रहस्यकथा, हे अमिट समीकरण झालं. अशा बाबुरावांची सर्वात जास्त रहस्यकथा लिहिणारा लेखक म्हणून ‘गिनीज बुक
आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. हे श्रेय जरी बाबुरावांकडे असले, तरी हा सगळा खटाटोप बाबुरावांचा निस्सीम वाचक कल्याणचे विभाकर कर्वे यांनी केला,
तेव्हा कुठे हे सर्व ‘रेकॉर्ड’ झाले.या विभाकर कर्वेंचा आणखी एक विशेष म्हणजे, त्यांच्याकडे बाबुराव अर्नाळकरांच्या जेवढ्या म्हणून रहस्यकथा आहेत, तेवढ्या कुणाकडेच नाहीत! या कर्वे यांना बाबुराव अर्नाळकरांवर पीएच.डी. करायची होती... ते झालं नाही, पण कर्वेंकडचं स्टॅटिस्टिक भारी आहे. उदा. झुंजारकडे डबल बॅरल गन केव्हा आली आणि केव्हा गेली, विजया नसलेली झुंजारकथा आहे का? वगैरे वगैरे...
‘गिनीज’मध्ये बाबुराव अर्नाळकरांचं नाव येण्यासाठी विभाकर कर्वे यांनी एवढा पाठपुरावा केला की, या गोष्टीत ते आता तरबेज झालेले आहेत. गिनीजमध्ये येण्यासाठी काय करायला लागतं, याचं उत्तम ज्ञान त्यांच्याकडे आहे!
रहस्यकथेच्या पर्वातला हा पहिला मानकरी. त्याने येणाऱ्या नव्या रहस्यकथा लेखकांचा मार्ग खुला केला. ज्यावर पुढे एस.एम. काशीकर, सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक यांनी स्वत:ची नाममुद्रा उमटवली. याखेरीज इतर मंडळी आली, तो स्वतंत्र लेखनाचा विषय होईल. ज्यात सुभाष शहा, माया सामंत, अनिल टी. कुलकर्णी, शरश्चंद्र वाळींबे ते पार निरंजन घाटे, अशोक थोटे वगैरे मंडळींनी पण हात साफ करून घेतला, पण ते रहस्यकथेचं जग हळूहळू विरत गेलं. कां, कसं, हा वेगळा विषय आहे.
मात्र, काहीही झालं तरी रहस्यकथा लेखक म्हणून बाबुराव अर्नाळकरांची नाममुद्रा लखलखीत आहे - न विसरता येण्यासारखी!