परतीचा प्रवास अत्यंत यातनादायक

By admin | Published: July 21, 2016 03:44 AM2016-07-21T03:44:03+5:302016-07-21T03:44:03+5:30

अमरनाथबाबाचे दर्शन घेतल्यानंतर काश्मीरमधील हिंसाचारामुळे प्रत्येकाला परतीच्या प्रवासाची ओढ लागली होती.

Return journey is extremely torture | परतीचा प्रवास अत्यंत यातनादायक

परतीचा प्रवास अत्यंत यातनादायक

Next

पंकज पाटील,

अंबरनाथ- अमरनाथबाबाचे दर्शन घेतल्यानंतर काश्मीरमधील हिंसाचारामुळे प्रत्येकाला परतीच्या प्रवासाची ओढ लागली होती. मात्र, वातावरण पाहून वाहने सोडली जात होती. अचानक हल्ल्याची शक्यता वाटली की, प्रवास थांबायचा. मग, कडाक्याच्या थंडीत रस्त्यालगतच्या तंबूत कुडकुडत रात्र काढायची. असे सव्यापसव्य करून विमानतळ गाठले, तर तेथेही परतीच्या प्रवाशांची तोबा गर्दी असल्याने विमानतळाबाहेरील रस्त्यावर पथारी पसरून रात्र काढावी लागली. या त्रासामुळे जर एखादा कावला, तर सोबतचे म्हणायचे ‘भोलेका नाम लो...’ हाच काय तो त्या यातनादायक प्रवासातील दिलाशाचा परवलीचा शब्द होता.
अमरनाथ यात्रेसाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे बालटाल. बालटालहून प्रवास केल्यावर दर्शन घेऊन भाविक पुन्हा येथेच पोहोचले. बालटाल ते श्रीनगर हे अंतर ९३ किमीचे आहे. हे अंतर कापण्यासाठी सरासरी तीन ते चार तास लागतात. मात्र, काश्मीरमधील वातावरण तंग असल्याने अनेक भाविकांच्या गाड्यांवर दगडफेक करून त्यांच्यामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सुरक्षा दलाची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. हजारो भाविक प्रत्येक रात्री गाड्यांमध्ये बसून परतीच्या प्रवासाची वाट बघत बसतात. मात्र, गाड्या न सोडण्याचे आदेश आल्यावर पुन्हा या भाविकांना गाड्यांमधून बाहेर पडून बालटाल येथील तंबूमध्ये रात्र काढावी लागते. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत कशीबशी रात्र काढताना उद्या तरी परतीचा प्रवास सुरू व्हावा, अशी प्रार्थना ते भोलेबाबाला करतात. सकाळी उठल्यावर बालटालमध्ये सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या लंगरमधील खाद्यपदार्थांचा आस्वाद भाविक घेतात. हॉटेलची संख्या कमी असल्याने प्रत्येकाला या लंगरवरच अवलंबून राहावे लागत आहे.‘भोलेका नाम लो और मन चाहे उतना खा लो’ अशा शब्दांत एकमेकांची समजूत काढली जाते. दिवस कसाबसा काढला की, पुन्हा रात्री सुटकेची प्रतीक्षा.
तीन दिवस हजारोंच्या संख्येने अडकलेल्या भाविकांच्या गाड्या अखेर रात्री ११ वाजता सोडण्याचा निर्णय झाला. बालटाल आणि सोनमार्ग येथे अडकलेले भाविक श्रीनगरच्या दिशेने निघाले. त्याचवेळी पेहलगाम येथूनदेखील गाड्यांचा ताफा श्रीनगरच्या दिशेने रवाना झाला. तीन दिवसांपासून अडकलेले भाविक एकाच दिवशी श्रीनगरमध्ये दाखल झाल्याने श्रीनगरमध्ये प्रचंड गर्दी झाली होती.
अनेक भाविक विमानाने प्रवास करणारे असल्याने सर्वांना रात्री २ च्या सुमारास श्रीनगर विमानतळावर सोडण्यात आले. विमानतळावर गेल्यावर थोडीशी झोप घेऊ, अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळाच्या एक किमी अंतरावर स्कॅनिंगकरिता थांबावे लागले. स्कॅनिंग पहाटे ५ वाजता सुरू होणार, हे कळताच अनेकांनी दाल लेकपाशी असलेल्या हॉटेलात नेण्याची विनंती वाहनचालकांना केली. मात्र, पुन्हा हल्ले झाले आणि वातावरण बिघडले तर विमानतळाकडे येणे मुश्कील होईल, असे त्यांनी सांगितल्याने अनेकांनी तो नाद सोडला. चेक पोस्टच्या बाहेरील रस्त्यावरच अंथर पसरले. तीन दिवसांचे जागरण असल्याने हल्ल्याचे सावट असतानाही अनेकांना रस्त्यावर शांत झोप लागली. चेकपोस्ट उघडल्यावर सामानाचे स्कॅनिंग झाले.
>विमानाच्या वेळेपूर्वी दोन तास अगोदर प्रवेश देण्याचे सांगितले. ज्यांची विमानाची वेळ सायंकाळी ३ ते ५ च्या दरम्यान होती, त्यांना विमानतळाबाहेर १२ तास ताटकळत बसावे लागले. सीमा सुरक्षा दलाने लोकांकरिता पुरीभाजीची व्यवस्था केलीहोती. श्रीमंत असो की गरीब, प्रत्येकजण या रांगेत दिसत होता. अखेरीस विमानात प्रवेश मिळाला... ते हवेत झेपावले... तेव्हा सुखरूप सुटकेचा नि:श्वास टाकला.

Web Title: Return journey is extremely torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.