मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु : हवामान विभागाकडून जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 09:30 PM2018-09-29T21:30:37+5:302018-09-29T21:34:45+5:30
देशात सध्या मॉन्सून कर्नाटक, तामिळनाडु आणि केरळ मध्ये सक्रिय असून उत्तर भारत, पूर्व भारतातील बहुतांश ठिकाणी त्याचे प्रमाण कमी झाले आहे़.
पुणे : मान्सूनने आपल्या परतीचा प्रवास सुरु केला असून राजस्थान, कच्छ व उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून तो माघारी परतल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केले आहे़. गेल्या वर्षी २०१७ मध्ये मॉन्सूनच्या माघारीला २७ सप्टेंबरला सुरुवात झाली होती व तो संपूर्ण देशातून २५ आॅक्टोबरला माघारी गेला होता़.
शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडला़. मराठवाड्यात हवामान कोरडे होते़
पेण १२०, कर्जत ६०, माथेरान, वैभववाडी ५०, भिवंडी, दाभोलीम, कुडाळ, मुल्दे, केपे, संगमेश्वर, देवरुख ३० मिमी पावसाची नोंद झाली होती़. मध्य महाराष्ट्रात श्रीरामपूर ४०, आजरा, चंदगड, गडहिग्लज, कोरेगाव, नेवासा, पेठ, संगमनेर, वडगाव मावळ ३० मिमी पाऊस झाला होता़.
देशात सध्या मॉन्सून कर्नाटक, तामिळनाडु आणि केरळ मध्ये सक्रिय असून उत्तर भारत, पूर्व भारतातील बहुतांश ठिकाणी त्याचे प्रमाण कमी झाले आहे़.
येत्या २४ तासात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतचा समुद्र खवळलेला असण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असून सर्वसाधारणपणे मॉन्सूनच्या परतीचा प्रवास १ सप्टेंबरपासून सुरु होत असतो़. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून त्याचा माघारीचा प्रवास काहीसा उशिरा सुरु होऊ लागला आहे़. २०१७ मध्ये मान्सूनची माघारी २७ सप्टेंबरपासून सुरु झाली़. महाराष्ट्रातून तो २४ आॅक्टोबरला माघारी गेला आणि संपूर्ण देशातून २५ आॅक्टोबरला परतला होता़. २०१६ मध्ये त्यांच्या माघारीस १५ सप्टेंबरला सुरु झाली़. महाराष्ट्रातून तो १६ आॅक्टोंबरला आणि संपूर्ण देशातून २८ आॅक्टोंबरला माघारी गेला होता़.