परतीच्या पावसाचा पिकांवर घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:41 PM2017-10-09T23:41:20+5:302017-10-09T23:41:37+5:30
खरीप हंगामात समाधानकारक पाऊस येईल, असे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते; पण खंड पाडत पावसाने तुरळकच हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीप हंगामात समाधानकारक पाऊस येईल, असे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते; पण खंड पाडत पावसाने तुरळकच हजेरी लावली. आता सोयाबीन सवंगणीवर आले असताना मात्र पावसाला जोर आला आहे. मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे आगमन होत आहे. परिणामी, कपाशीचे बोंड गळत असून सोयाबीनची सवंगणी रखडली आहे. यात शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे.
खरीप हंगामात शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली. गरज असताना पावसाचे आगमन झाले नाही; पण आता सोयाबीनची कापणी, सवंगणी सुरू असताना पावसाने जोर धरला आहे. यामुळे अनेक शेतकºयांचे सोयाबीन ओले झाले. शिवाय झाडावरील कपाशीची बोंडे, फुटलेला कापूस गळत आहे. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत असून भरपाईची मागणी होत आहे.
परतीच्या पावसाने कापलेले सोयाबीन पाण्यात
विजयगोपाल - ऐन सोयाबीन काढण्याच्या वेळी धो-धो पाऊस बरसत असल्याने शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे. कापलेच्या सोयाबीनच्या कवट्याला जमिनीवरील पाणी मिळत असल्याने सोयाबीनच्या शेंगाच्या दान्याला कोंब फुटत आहे. कापलेले सोयाबीन सडण्यास सुरूवात झाली आहे. यातही दोन ते तीन दिवसांत पाऊस बंद न झाल्यास एक लाख हेक्टरवरील सोयाबीन सडण्याचा धोका आहे.
परतीच्या पावसामुळे शेतकरी धास्तावला आहे. संकटाचा सामना करीत शेतातील सोयाबीन काढणीला सुरूवात केली आहे. येथील शेतकरी करणसिंह ताटू, दिलीप श्रीराव, संतोष पेटकर यांनी कापलेले सोयाबीन थ्रेशरने शनिवारी काढले; पण सायंकाळी पाऊस आला. यामुळे सुमारे १५ ते २० पोते सोयाबीन शेतातच ओले झाले. शेतात बैलबंडी व ट्रॅक्टर जात नसल्याने सोयाबीन आणण्यास शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगा सडण्यास सुरूवात झाली आहे. अनेक शेतातील सोयाबीनच्या शेंगाच्या दान्यातील कोंब फुटत आहे. अशा स्थितीत प्रशासनाने धीर देणे गरजेचे असताना सर्व आॅलवेल असल्याचा अहवाल दिला आहे. सध्या शेतात कापलेले सोयाबीनचे ढिग लागले आहे. काहींचे सोयाबीन काढणीच्या प्रतीक्षेत आहे; पण पावसामुळे डोळ्यादेखत पीक उद्ध्वस्त होत आहे. सोयाबीन झाकण्यासाठी पूरेशी व्यवस्था नसल्याने शेतकरी हतबल आहे. कापसाचे बोंड सडत असून फुटलेला कापूस ओला झाला आहे.
महसूल प्रशासन पैसेवारी जाहीर करते. तत्पूर्वी, गावांतून तज्ज्ञ कमिटीचा अहवाल घेतला जातो; पण यंदा कागदावरच पैसेवारी काढल्याचे दिसते. याबाबत तलाठ्यांना विचारले असता वरून आदेश असल्याचे सांगितले जात आहे.
सोयाबीनच्या शेंगांना फुटले कोंब
विरूळ (आकाजी) - कापणीच्या वेळेवर पाऊस येत असल्याने सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. काहींनी सोयाबीन कापून गंजी लावल्या तर काहींची कापणी व्हायची आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे सातत्य असल्याने कापलेल्या तथा झाडावरील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटल्याचे दिसून येत आहे. विरूळ तथा परिसरातील अनेक गावांत हा प्रकार पाहावयास मिळतो. यात शेतकºयांचे नुकसान होत असून पावसामुळे हाती आलेले पीक वाया जाणार असल्याचेच दिसून येत आहे.