परतीच्या पावसाचा प्रवास आता ऑक्टोबरमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 03:43 AM2019-09-27T03:43:40+5:302019-09-27T03:43:55+5:30
मान्सूनबाबत स्कायमेटचा अंदाज : हवामानातील बदलामुळे पावसाचा कालावधी लांबला
मुंबई : मान्सूनचा या वर्षीचा परतीचा प्रवास लांबणार आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल. मान्सूनच्या परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानातून सुरू होतो. पश्चिम राजस्थानातून मान्सून पहिल्यांदा परतीच्या प्रवासाला निघतो. मात्र या वेळी हवामानातील बदलामुळे परतीचा प्रवास लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्षात मान्सून केरळमध्ये १ जून रोजी दाखल होतो. केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने देशही विलंबाने व्यापला होता. आता परतीच्या प्रवासालाही मान्सून विलंबाने सुरुवात करणार आहे. गेल्या १० वर्षांत मान्सून सर्वाधिक विलंबाने म्हणजे २९ सप्टेंबर रोजी परतीला निघाला होता तर मान्सूनने परतीचा प्रवास सर्वाधिक लवकर म्हणजे ४ सप्टेंबर रोजी सुरू केला होता. आणि आता म्हणजे २०१९ साली मान्सून आणखी एक नवा रेकॉर्ड नोंदविण्याच्या मार्गावर आहे.
हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवसांत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरयाणा, दिल्लीसह अनेक राज्यांत पाऊस पडेल. झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथेही पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
परतीच्या पावसाला का होतोय उशीर?
देशाच्या दोन्ही समुद्रकिनारी मान्सूनचा जोर आहे. दक्षिण पूर्वेकडील वारे उत्तर पश्चिम दिशेने वाहत आहेत. यातच अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आणि हिक्का नावाचे चक्रिवादळ उठले. हे सुरू असतानाच बंगालच्या खाडीतही हवामानात बदल होत राहिले. परिणामी, मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला उशीर होत आहे.
असा झाला प्रवास
देशभरात जून महिन्यात मान्सूनचे प्रमाण ३३ टक्के कमी होते.
जुलै महिन्यात ५ टक्के वाढ झाली. आॅगस्टमध्ये सर्वसाधारण मान्सूनच्या तुलनेत मान्सूनमध्ये १५ टक्के वाढ झाली. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक मान्सूनची नोंद झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातसह महाराष्ट्रात पूरस्थिती नोंदविण्यात आली.
बिहारमध्येही उत्तम पाऊस नोंदविण्यात आला.
सप्टेंबर महिन्यात ३२ टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला.