हवामान खात्याचा अंदाज पुन्हा खोटा ! मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र कोरडाच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 07:09 AM2018-07-11T07:09:41+5:302018-07-11T07:09:57+5:30
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज पुन्हा खोटा ठरला. मोठा पाऊस झाला नाहीच. उलट मागील दोन दिवस तर मराठवाडा चक्क कोरडाच राहिला.
औरंगाबाद - मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज पुन्हा खोटा ठरला. मोठा पाऊस झाला नाहीच. उलट मागील दोन दिवस तर मराठवाडा चक्क कोरडाच राहिला.
८ ते ९ जुलैदरम्यान ५० ते ७५ मि. मी. दरम्यान पाऊस होईल व त्यानंतरचे पुढील तीन दिवस २५ ते ५० मि. मी. दरम्यानच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मुंबई व कोकण किनारपट्टीसह विदर्भातील कमी दाबाचा पट्टा पुढे सरकेल आणि मध्य मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल, असे हवामान खात्याने गृहीत धरले होते. घडले भलतेच.
हवामान खात्याचे अभ्यासक प्रा.किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, गोवा, कोकण, मुंबई, विदर्भ भागांत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो पट्टा दोन दिवसांपासून स्थिर आहे. तो पट्टा पुढे सरकेल याचे अनुमान हवामान खात्याने लावले होते. परंतु तसे काहीही झाले नाही. परिणामी दोन दिवस मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पाऊस झाला नाही. पुढील दोन दिवसदेखील अशीच स्थिती राहू शकते.
२०२ मंडळांत पावसाची कृपा
जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील ५० टक्के मंडळांवर पावसाची कृपा राहिली. विभागातील ५० टक्के भूभाग पावसाच्या कृपादृष्टीने चिंब झाला असला तरी अनेक मंडळांत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. ७ जून रोजी मान्सूनचे आगमन होण्याची तारीख असली तरी जूनअखेरीस मान्सून सक्रिय झाला. २५ टक्केही पाऊस न झालेल्या ५ मंडळांत औरंगाबादच्या ३ मंडळांचा समावेश आहे. यात जालना आणि बीडमधील प्रत्यके १ मंडळ आहे. २० गावांमागे १ तर एका तालुक्यात ५ सर्कलचे सरासरी प्रमाण आहे. मराठवाड्यात ८ हजार ५२२ गावे आहेत. विभागातील ९२ मंडळांत ७५ ते १०० टक्केदरम्यान तर ८१ मंडळांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. ४१ मंडळांत २५ ते ५० टक्क्यांदरम्यान पाऊस झाला. मराठवाड्यात ४२१ मंडळांत पावसाची नोंद होते.