भाजपात पांडे का बदला
By Admin | Published: November 3, 2016 03:24 AM2016-11-03T03:24:46+5:302016-11-03T03:24:46+5:30
शिवसेनेला तगडी टक्कर देणारे संजय पांडे यांनाच आपल्या तंबूत दाखल करून ऐन दिवाळीत शिवसेनेने युतीधर्माचे फटाके फोडले आहेत.
ठाणे : भाजपातील दिग्गज आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघात शिवसेनेला तगडी टक्कर देणारे संजय पांडे यांनाच आपल्या तंबूत दाखल करून ऐन दिवाळीत शिवसेनेने युतीधर्माचे फटाके फोडले आहेत. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेलाही धक्का देण्याची रणनिती आखली असून सोमवारनंतर देवदिवाळी साजरी करण्याचे ठरविले आहे. तुम्हा एक फोडला, तर आम्ही त्यापेक्षा मोठे इनकमिंग करून दाखवू अशी भाजपा नेत्यांची भाषा असल्याने शिवसेना-भाजपातील निवडणूकपूर्व संघर्ष तापण्याची चिन्हे आहेत.
ठाणे पालिका निवडणुकीची जबाबदारी असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण कोकणातून परतल्यानंतर हे धमाके होतील, असे भाजपातील सूत्रांनी स्पष्ट केले. पालिका निवडणुकीत युती करण्याची भाषा एकीकडे करायची आणि दुसरीकडे मित्र पक्षालाच
धक्का द्यायचा, अशा शिवसेनेच्या वृत्तीमुळे भाजपामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आम्ही तुमचे किती फोडतो हेच बघा, असा इशारा देत ७ नोव्हेंबरनंतर इनकमिंगचा धमाका करण्याचा इशाराच भाजप नेत्यांनी शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात ठाण्यात युतीतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
>निष्ठावंतांचा वेगळा गट
दिवाळीत तोंड गोड करत असतानाच शिवसेनेने भाजपाचे ओवळा-माजिवडा मतदारसंघातील विधानसभेचे उमेदवार संजय पांडे यांना शिवसेनेत खेचून आणले. अर्थात या इनकमिंगमुळे शिवसेनेच्या निष्ठावंतांमधील खदखद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
आता तरी इनकमिंग थांबवा असा इशारा त्यांनी पुन्हा एकदा श्रेष्ठींना दिला आहे. इनकमिंग थांबले नाही, तर मात्र आम्हीही वेगळा विचार करु, असा त्यांचा नारा आहे. काहींनी तर थेट भाजपाशी हातमिळवणी करु, अशी भाषा सुरु केल्याचे बोलले जाते.
इनकमिंगला शह देण्यासाठी शिवसेनेतील निष्ठावान मंडळी एकत्र येत असून त्यांनी आपली वेगळी फळी उभारण्यासाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेत निष्ठावतांचा वेगळा गटच जन्म घेतो का काय, असे वातावरण तयार झाले आहे.
>विधानसभेची मोर्चेबांधणी : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी आपला कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ ‘सेफ’ केल्यानंतर आता संजय पांडे यांच्या शिवसेना प्रवेशाने प्रताप सरनाईक यांच्यासाठी ओवळा-माजिवडा मतदारसंघही ‘सेफ’ केल्याचे बोलले जाते. एकूणच ‘एक तीर मे दो निशाने’ साधत शिवसेनेने पालिका निवडणुकीच्या सोबतीने विधानसभा निवडणुकीचीही मोर्चेबांधणी सुरु केल्याचे पक्षाच्या वर्तुळात बोलले जाते.
>इनकमिंग सेना विरूद्ध निष्ठावान सेना?
ज्या पालिका निवडणुकीत खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे, त्या निवडणुकीला रंग भरत असताना खुद्द मित्र पक्षानेच धक्का दिल्याने भाजपामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे अन्य पक्षांतील उमेदवाराबरोबरच शिवसेनेतील नाराजांवर त्यांचा डोळा आहे.
त्यासाठी मोर्चेबांधणी आहे. काही नाराजांशी यशस्वी चर्चा झाल्याचा दावा भाजपाने केला आहे. यापूर्वी घोडबंदरमधील नाराज माजी नगरसेवकाला भाजपाने आपलेसे केले. आता शिवसेनेतील नाराज निष्ठावतांच्या नाराजीचा फायदा उचलत त्यांना कमळाच्या तिकिटावर लढण्याची संधी भाजपा देणार आहे. त्यातून शिवसेना विरुध्द निष्ठावान शिवसैनिक अशी लढत घडवण्याचा त्यांचा मानस आहे.