बदली न स्वीकारणाऱ्यांची कानउघडणी
By admin | Published: May 18, 2016 02:44 AM2016-05-18T02:44:33+5:302016-05-18T02:44:33+5:30
मावळत्या आयुक्तांनी बदलीचे आदेश काढूनही नव्या ठिकाणी हजर न राहणाऱ्यांची नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी चांगलीच हजेरी घेतली.
सूर्यकांत वाघमारे,
नवी मुंबई -मावळत्या आयुक्तांनी बदलीचे आदेश काढूनही नव्या ठिकाणी हजर न राहणाऱ्यांची नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी चांगलीच हजेरी घेतली. या तंबीनंतर अवघ्या दोन दिवसांत ५० ते ६० पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीच्या नव्या ठिकाणी धाव घेत कार्यभार स्वीकारला आहे.
नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हेमंत नगराळे यांनी शनिवारी सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी आयुक्तालयाचा आढावा घेत कामचुकार अधिकाऱ्यांची देखील कानउपटणी केल्याचे समजते. गुन्हेगारीमुक्त शहराचे स्वप्न मांडत नवनियुक्त आयुक्त नगराळे यांनी सहकाऱ्यांकडून देखील पारदर्शक कामाचीही अपेक्षा व्यक्त केली. याचदरम्यान मावळते आयुक्त प्रभात रंजन यांनी बदलीचे आदेश काढूनही अद्याप नव्या ठिकाणी हजर न झालेल्यांनाही तंबी दिल्याचे सूत्रांकडून समजते. रंजन यांनी वरिष्ठ निरीक्षकांसह पोलीस निरीक्षक, साहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक अशा ११४ जणांच्या बदलीचे आदेश काढले होते. यानंतर सुमारे १५ ते २० दिवसांत त्यांची बढतीरूपी बदली झाली. परंतु त्यांनी आदेश काढूनही सुमारे ५० ते ६० पोलीस अधिकाऱ्यांनी नव्या ठिकाणी कार्यभार स्वीकारलेला नव्हता. विविध कारणांवरून सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणीच राहण्याची अनेकांची इच्छा होती. त्यापैकी काहींनी हे इच्छापत्र उपायुक्तांना देखील दिलेले असल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र काही दिवसांपूर्वीच उपायुक्तांच्या देखील बदल्या झालेल्या असल्यामुळे निर्णयाविनाच पडून असलेल्या त्यांच्या पत्रांना तितके महत्त्व राहिलेले नाही. परंतु वरिष्ठांना पत्र दिले असल्याचे सांगत काही अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी जाण्याला नकार दिला होता. यामुळे एका अधिकाऱ्याने पदभार सोडलेला नसल्याने त्या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्याला रुजू होण्यात अडथळा निर्माण होत होता. कार्यकाळ संपूनही एकाच पोलीस ठाण्यात टिकून राहण्याचा काही अधिकारी केविलवाणा प्रयत्न करीत होते. त्यांच्या या इच्छेमागे हित-स्वार्थ दडला असण्याची शक्यता देखील होती. ही बाब नवनियुक्त आयुक्त हेमंत नगराळे यांनी चाणाक्षपणे ओळखली. यामुळे त्यांनी आयुक्तालयातल्या पहिल्याच बैठकीत बदलीचे आदेश धुडकावणाऱ्या त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. परिणामी दुसऱ्याच दिवशी रविवारी बहुतांश अधिकाऱ्यांनी नवा पदभार स्वीकारून आयुक्तांची वक्रदृष्टी टाळली. तर उर्वरित अधिकाऱ्यांनी सोमवारी धावपळ करीत बदली आदेशानुसार मिळालेल्या नव्या पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यावरून नगराळे यांनी पहिल्याच भेटीत दरारा निर्माण केल्याचे पाहायला मिळाले असले तरी शहरातील गुन्हेगारीचे आव्हान ते कशाप्रकारे पेलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.