‘परिवहन’ला १00 कोटींचा महसूल
By admin | Published: April 3, 2017 05:45 AM2017-04-03T05:45:04+5:302017-04-03T05:45:04+5:30
बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलपासून बंदी घातली.
मुंबई : बीएस या मानकात वेळोवेळी सुधारणा होत असते. त्यानुसार, बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलपासून बंदी घातली. मात्र, ३१ मार्चपर्यंत वाहन कंपन्यांनी या मानकातील वाहने सवलत देऊन विक्रीला काढल्याने त्याचा फायदा राज्याच्या परिवहन विभागाला झाला आहे. ३0 व ३१ मार्च या दोन दिवशी झालेल्या अन्य वाहनांबरोबरच बीएस-३ वाहन नोंदणीमुळे तब्बल १00 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.
वाहन कंपन्यांकडून ३0 व ३१ मार्च रोजी बीएस-३ वाहनांवर २0 ते ३0 टक्के सवलत देऊन वाहन विक्री केली. ३१ मार्च रोजी तर या मानकातील वाहन विक्रीसाठी शोरूम रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाहन नोंदणी व्यवस्थित पार पडावी, यासाठी आरटीओ कार्यालयेही रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली. राज्यभरात दररोज ८ ते ९ हजार वाहनांची नोंदणी होते. मात्र, बीएस-३ वाहनांमुळे ही नोंदणी तीन पटीने वाढली. २0१५-१६ रोजी २३ लाख ३ हजार ७८३ नवीन वाहनांची नोंदणी झाली होती. मात्र, २0१६-१७ या आर्थिक वर्षातील मार्च महिन्याच्या शेवटच्या २ दिवसांत मोठ्या प्रमाणात वाहन नोंदणी झाली. या संदर्भात राज्य परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांना विचारले असता, ३0 आणि ३१ मार्च रोजी बीएस-३ मानकातील वाहनांची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाल्याने दररोज मिळणाऱ्या महसुलात वाढ झाली.
वाहन नोंदणीतून रोज २0 ते २५ कोटी रुपये महसूल मिळतो. मात्र, मार्च महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत हा महसूल अंदाजे १00 कोटी रुपयांपर्यंत गेल्याचे सांगितले. ३१ मार्चपर्यंत विक्री झालेल्या बीएस-३ इंजिन वाहनांची नोंदणी १ एप्रिलनंतरही आरटीओत होऊ शकते. त्यामुळे वाहन चालकांना हा दिलासाच असणार आहे. (प्रतिनिधी)
>सवलत देऊन विक्री
वाहन कंपन्यांकडून ३0 व ३१ मार्च रोजी बीएस-३ वाहनांवर २0 ते ३0 टक्के सवलत देऊन वाहन विक्री केली. ३१ मार्च रोजी तर या मानकातील वाहन विक्रीसाठी शोरूम रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाहन खरेदीसाठी तर मुंबईसह राज्यातील अन्य शहरांतील शोरूममध्ये झुंबडच उडाली होती.