१०० गावांतील महसुलाचे काम ठप्प

By Admin | Published: October 20, 2016 01:26 AM2016-10-20T01:26:17+5:302016-10-20T01:26:17+5:30

अतिरिक्त पदभार असलेल्या तलाठी कार्यालयांच्या चाव्या तहसीलदारांकडे जमा केल्याने भोर, वेल्हे तालुक्यातील सुमारे १०० गावांतील महसूल कामकाज ठप्प झाले

The revenue of 100 villages was stalled | १०० गावांतील महसुलाचे काम ठप्प

१०० गावांतील महसुलाचे काम ठप्प

googlenewsNext


भोर : भोर, वेल्हे तालुक्यातील तलाठ्यांकडे अतिरिक्त गावे असलेल्या गावांतील कामांचा बोजा तलाठ्यांवर पडत असल्याने संबंधित गावात काम न करण्याचा निर्णय पुणे जिल्हा तलाठी संघाने घेऊन अतिरिक्त पदभार असलेल्या तलाठी कार्यालयांच्या चाव्या तहसीलदारांकडे जमा केल्याने भोर, वेल्हे तालुक्यातील सुमारे १०० गावांतील महसूल कामकाज ठप्प झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
भोर तालुक्यात १९६ गावे असून, ४५ सजे आणि ४५ तलाठी असून, यातील ६० गावांचा अतिरिक्त चार्ज आहेत. तर, वेल्हे तालुक्यात ११५ महसुली गावे असून, ३४ सजे आणि ३४ तलाठी असून ११ सज्यातील ४४ गावे अतिरिक्त आहेत. यामुळे एका तलाठ्याकडे अतिरिक्त गावे धरून १० ते १५ गावांची कामे करावी लागतात. शिवाय अतिरिक्त गावांच्या कामांसाठी तलाठ्यांना ६० टक्के भत्ता दिला जातो. तो मिळत नाही. शिवार फेरी, राजस्व अभियानाची कामे अशी विविध कामे व त्यासाठी लागणारा खर्चही तलाठ्यालाच करावा लागतो. यामुळे कामाचा बोजा तलाठ्यांवर पडत आहे. तर, आॅनलाइन सात/बाराची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून, ओ.डी.सी साईट बंद असल्याने ७/१२ दुरुस्त होत नाही. सम विषम तारखेला काम करावे लागत असून, भोरला विषम तारीख आहे. मात्र, अनेकदा वीज नसते. दिवसभर बसल्यावर एक ते दोनच गटांचे काम होते. यामुळे वेळ वाया जात असून, नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. यामुळे अतिरिक्त गावात काम बंद करण्यात आले आहे.
सजात ९ गावांऐवजी ४ गावांचा मिळून एक सजा करावा. यामुळे तलाठ्यांना कामाचा ताण येणार नाही, यासाठी शासनाकडे दोन वर्षे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्याला मंजुरी मिळाली नाही. संगणकीकरणाचे काम सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत असावे, सुटीत कामकाज बंद असावे,अतिरिक्त गावांचा कार्यभार न स्वीकारणे गौण खनिजाबाबत तलाठी व मंडल अधिकारी पोलीस ठाण्यात फिर्याद देणार नाहीत. नवीन तलाठी भरती करावी आणि तलाठ्यांकडील अतिरिक्त गावांचा चर्चे काढावा,अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
>तलाठ्यांनी अतिरिक्त गावातील कामकाज बंद केल्याने भोर व वेल्हे तालुक्यातील १०० गावांतील कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे सदरच्या गावातील नागरिकांना महसूल विभागांतर्गत येणारी ७/१२, विविध दाखले, नोंदी अशी विविध कामे होत नाहीत. त्यामुळे नागरिक त्रास्त झाले आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त करीत आहेत.
जिल्हा तलाठी संघाने याबाबत वारंवार निवेदन देऊन लेखणी बंद आंदोलन केले, संपही केला; परंतु शासनाने दखल न घेतल्याने अतिरिक्त गावात काम न करण्याचा निर्णय घेतल्याचे पुणे जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष हेमंत नाईकवडी व तलाठी संघाच्या पतसंस्थेचे अध्यक्ष सुधीर तेलंग यांनी सांगितले.

Web Title: The revenue of 100 villages was stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.