महसूल लिपिक बनले ‘महसूल सहायक’; अनेक वर्षांची मागणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 02:22 AM2020-08-24T02:22:23+5:302020-08-24T02:22:38+5:30
गेल्या वर्षी ४ जुलैला राज्य शासनासोबत चर्चा झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदनामबदलाची मागणी मान्य असल्याचे लेखी पत्र राज्य महसूल संघटनेस दिले होते.
सुरेश लोखंडे
ठाणे : प्रलंबित असलेल्या प्रमुख मागण्यांपैकी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेच्या लिपिकाचे पदनाम बदलण्याची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. राज्य शासनाने २० आॅगस्टला जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ‘महसूल सहायक’ असे या पदाचे नामकरण करण्यात आले आहे, असे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा शाखेचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रशांत कापडे, भास्कर गव्हाळे यांनी सांगितले.
राज्य शासनाचे सहसचिव डॉ. संतोष भोगले यांनी गुरुवारी डिजिटल स्वाक्षरीद्वारे महसूल शाखेच्या लिपिकाचे पदनाम ‘महसूल सहायक’ केल्याचा आदेश जारी केला आहे. वास्तविक, ही मागणी राज्य संघटनेतर्फे १९८७ पासून करण्यात येत होती. यासाठी १९९५ मध्ये तत्कालीन सुनील जोशी, रवींद्र देशमुख, आर.जे. पाटील आदी ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली १० दिवसांचा संपही झाला होता, असेही कापडे यांनी सांगितले.
प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जुलै २०१९ पासून कालबद्ध आंदोलनाचा कार्यक्रम राज्य संघटनेने जाहीर केला होता. त्यानुसार, ४ सप्टेंबर २०१९ रोजी अपर मुख्य सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघटनेसोबत १९ प्रलंबित मागण्यांपैकी प्रमुख १३ मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठक ठेवली होती. २० आॅगस्टला झालेल्या निर्णयानुसार पदनाम बदलण्याची मागणी पूर्ण झाली.
गेल्या वर्षी ४ जुलैला राज्य शासनासोबत चर्चा झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदनामबदलाची मागणी मान्य असल्याचे लेखी पत्र राज्य महसूल संघटनेस दिले होते. मात्र, राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यावर त्यांच्याकडे या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला होता.
महसूल कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
'लिपिक'पदाचे आता 'महसूल सहायक’ असे नामकरण झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी व अधिकारी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याबद्दल राज्य महसूल संघटनेचे मागील सर्व पदाधिकारी, विद्यमान पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व कर्मचारी यांनी राज्य महसूल संघटनेवर विश्वास दर्शवून पाठिंबा देऊन सर्वांची साथ आणि सहयोग व मार्गदर्शन मिळाल्याने आम्ही राज्य महसूल संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, अपर मुख्य सचिव, महसूल व वित्त सचिव, सचिव सामान्य प्रशासन आदींचे राज्य महसूल संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत, असे कापडे यांनी सांगितले.