महसूल कर्मचा-यांचा संप स्थगित, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांसोबतच्या चर्चेनंतर घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:45 AM2017-10-14T04:45:26+5:302017-10-14T04:46:06+5:30
राज्यातील महसूल कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेने संप स्थगित केल्याचे सायंकाळी जाहीर केले.
मुंबई : राज्यातील महसूल कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेने संप स्थगित केल्याचे सायंकाळी जाहीर केले. याबाबत मंत्रालयात महसूल मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेबरोबर बैठक झाली.
विविध मागण्यांसाठी राज्यातील महसूल कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले होते. महसूल लिपीकाचे पदनाम बदलण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. अव्वल कारकून संवर्गातील वेतनश्रेणीतील त्रुटी व नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड पे वाढविण्यासंदर्भात राज्य वेतन सुधारणा समितीकडे संघटनेने मागणी केल्यास त्याला पाठिंबा देण्यात येईल. शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नतीसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यासंदर्भात सहमती असून यासंबंधीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविणे, पुरवठा विभागातील निरीक्षकांची पदे शंभर टक्के बदली व पदोन्नतीने भरण्यास व त्यासंदर्भात सेवा प्रवेश नियमात बदल करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.
सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे संघटनेने संप स्थगित केल्याचे पत्र महसूल मंत्री पाटील यांना देण्यात आले. यावेळी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, संघटनेचे कार्याध्यक्ष द. मा. देशपांडे, सरचिटणीस हेमंत साळवी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्र्यांना पत्र-
विविध मागण्यांसाठी राज्यातील महसूल कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले होते. परंतु, आता याप्रकरणी सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे संघटनेने संप स्थगित केल्याचे पत्र महसूल मंत्री पाटील यांना देण्यात आले.