महसूलमंत्री खडसेंच्या पुतण्यासह चौघांवर गुन्हा
By admin | Published: January 1, 2015 03:05 AM2015-01-01T03:05:37+5:302015-01-01T08:43:03+5:30
८० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुतण्यासह बाजार समितीचे सभापती व अन्य दोघांविरुद्ध आकोट पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
आकोट बाजार समिती : आकोट (जि़ अकोला) : आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका बांधकाम प्रकरणात खोटे दस्तऐवज करून ८० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुतण्यासह बाजार समितीचे सभापती व अन्य दोघांविरुद्ध आकोट पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २००८ ते २०१४ या काळात बांधकाम करण्यात आले. या बांधकामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार १० जानेवारी २०१४ रोजी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनी शासनाकडे केली होती. त्यानंतर अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून कामाची पाहणी करुन अहवाल सादर केला़ बाजार समितीचे सभापती रमेश हिंगणकर, माजी सचिव मोहसीन बेग मिर्झा, वास्तू शिल्पकार तथा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे पुतणे हरीश खडसे, कंत्राटदार सुनील अग्रवाल यांनी संगनमत करून मोजमाप पुस्तिकेमध्ये न झालेल्या, तसेच अर्धवट झालेल्या कामांचे खोटे मोजमाप लिहून खोटे दस्तऐवज तयार केले. यात ८० लाख रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे अहवालात नमूद आहे.
याप्रकरणी माजी जि.प. उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनी आकोट शहर पोलिसात तक्रार दिली होती. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने पुंडकर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या वर न्या़ व्ही.एन. मोरे यांच्यासमोर सुनावणी होऊन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यावरून बाजार समितीचे सभापती रमेश हिंगणकर, तत्कालीन सचिव मोहसीन बेग मिर्झा, वास्तू शिल्पकार हरीश काशीनाथ खडसे, कंत्राटदार सुनील अग्रवाल यांच्याविरुद्ध आकोट शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.