जीएसटीतील घोळामुळे महसूल बुडाला - चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2016 04:59 AM2016-09-20T04:59:50+5:302016-09-20T04:59:50+5:30
(जीएसटी) विधेयकाबाबत निर्णय घेताना केलेल्या घोडचुकीमुळे देशाचा हजारो कोटींचा महसूल बुडाल्याचा धक्कादायक आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला
मुंबई : केंद्र सरकारने वस्तू व सेवाकर (जीएसटी) विधेयकाबाबत निर्णय घेताना केलेल्या घोडचुकीमुळे देशाचा हजारो कोटींचा महसूल बुडाल्याचा धक्कादायक आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने घोळ घातल्यामुळे देशातील महानगरपालिकांचा कर बुडाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जीएसटीला मंजुरी मिळाल्यानंतर १६ सप्टेंबर रोजी केंद्राने काढलेल्या अधिसूचनेद्वारे कलम १७ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचा जकात आणि ५० कोटींपेक्षा अधिकच्या उलाढालीवरील एलबीटी कर गोळा करण्याचा अधिकार रद्द झाला आहे. शिवाय देशातील पेट्रोलियम आणि मद्य वगळता इतर उत्पादनावरील अबकारी करही पालिकांना गोळा करता येणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारपुढे आता पर्याय उरलेला नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. सरकारने केलेली ही मोठी चूक आहे. ती दुरुस्त केली पाहिजे, असेही चव्हाण या वेळी म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेनेही जकात कर आणि राज्यातील इतर महापालिकांनी एलबीटी गोळा करणे तत्काळ बंद करावे आणि चार दिवसांत गोळा केलेला एलबीटी व जकात कर परत करावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे. (विशेष प्रतिनिधी)
>‘ते’ नोटिफिकेशन लागूच झाले नव्हते - मुनगंटीवार
केंद्र सरकारचे नोटिफिकेशन राज्यात लागूच केले नव्हते. राज्यात पूर्वीप्रमाणेच करवसुली सुरू होती व सुरू आहे. त्यामुळे नोटिफिकेशनचा परिणाम झाला, या म्हणण्यात अर्थ नसल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.