नागपूरच्या ‘फर्स्ट सिटी’ प्रकल्पाचे पुनरुज्जीवन
By Admin | Published: May 5, 2016 01:28 AM2016-05-05T01:28:11+5:302016-05-05T01:28:11+5:30
नागपूरच्या मिहान प्रकल्पातील गेली काही वर्षे रखडलेल्या ‘फर्स्ट सिटी’ या खासगी गृहनिर्माण प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) आज मान्यता
मुंबई : नागपूरच्या मिहान प्रकल्पातील गेली काही वर्षे रखडलेल्या ‘फर्स्ट सिटी’ या खासगी गृहनिर्माण प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) आज मान्यता देण्यात आली. आता या प्रकल्पासाठी आयजेएम या मलेशियन कंपनीचे सहाय्य लाभणार आहे.
चौरंगी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या अतुल शिरोडकर यांच्या कंपनीने हा गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतला होता. तथापि, प्रकल्पाबाबत तक्रारी आल्यानंतर आधीच्या आघाडी सरकारने मिहान आणि या कंपनी दरम्यान झालेला करार रद्द केला होता. तेव्हापासून काम थांबल्याने खळबळ उडाली.
प्रकल्प रखडल्यानंतर फ्लॅटधारकांनी मिहान आणि चौरंगी कंपनीविरुद्ध पोलिसांत तक्रारी केल्या होत्या. हा प्रकल्प पूर्ण करण्याची कंपनीची इच्छा असल्याचे सांगताना शिरोडकर यांनी विजया बँकेच्या १२० कोटींच्या कर्जापैकी १० टक्के एमएडीसीकडे भरले होते. शिरोडकर यांनी विनंती करूनदेखील कराराचे पुनरुज्जीवन होऊ शकले नव्हते. शिरोडकर यांनी गेल्या ३० मार्च रोजी सरकारला नवीन प्रस्ताव दिला. त्यानुसार विजया बँकेचे १२० कोटी रुपयांचे कर्ज एकरकमी फेडण्याची आणि एमएडीसीचा पैसाही परत करण्याची तयारी दर्शविली आणि प्रकल्पाचे उर्वरित बांधकाम आयजेएम कंपनीसोबत संयुक्त कंपनी स्थापन करून पूर्ण केले जाईल, असा प्रस्ताव दिला. एमएडीसीच्या आजच्या बैठकीत त्याला तत्त्वत: मान्यता देण्यात आली. आजच्या बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव पी.एस.मीना, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, एमएडीसीचे उपाध्यक्ष विश्वास पाटील आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
अॅग्रो इंडस्ट्रियल पार्कसाठी लवकरच निविदा
नागपूरच्या मिहान प्रकल्पात ३०० एकर परिसरात अॅग्रो इंडस्ट्रियल पार्कमध्ये उद्योग उभारण्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. या प्रकल्पाला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शिर्डी येथील विमानतळावरून प्रवासी वाहतूक तातडीने सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या विमानतळाचे काम बव्हंशी पूर्ण झाल्याची माहिती एमएडीसीचे उपाध्यक्ष विश्वास पाटील यांनी यावेळी दिली.
अॅग्रो इंडस्ट्रियल पार्कसाठी कृषी क्षेत्रातील प्रथम श्रेणीच्या उद्योजकाकडून खुल्या निविदा मार्गाने प्रस्ताव मागविले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी कृषी क्षेत्रातील उत्तम संस्था पुढे याव्यात म्हणून ‘एमएडीसी’ने त्यांच्या गुणवत्तेसाठी मानदंड ठरविले आहेत. संबंधित उद्योजकाची गेल्या तीन वर्षाची वार्षिक उलाढाल ३०० कोटी रु पयांची असावी, त्याने दरवर्षी नागपूर व परिसरातील शेतकरी आणिआदिवासींकडून शेती व वन्य औषधी अशा स्वरूपाच्या दर वर्षी १०० कोटी रूपयाचा माल खरेदी करावयाचा आहे. त्याने दरवर्षी एक हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षित करावयाचे आहे.