महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट पुनरुज्जीवित करा
By admin | Published: October 1, 2016 02:22 AM2016-10-01T02:22:46+5:302016-10-01T02:22:46+5:30
चंद्रपूर येथील महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट लिमिटेड ही कंपनी पुनरुज्जीवित करण्याची मागणी लोकमत मीडिया एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी बुधवारी केंद्रीय पोलादमंत्री
नवी दिल्ली : चंद्रपूर येथील महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट लिमिटेड ही कंपनी पुनरुज्जीवित करण्याची मागणी लोकमत मीडिया एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी बुधवारी केंद्रीय पोलादमंत्री चौधरी वीरेंद्रसिंग यांची भेट घेऊन केली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिस अहमद हे त्यांच्यासोबत होते.
गडचिरोली जिल्ह्यालगत सुरजगड भागात विपुल प्रमाणात लोह खनिज उपलब्ध असल्यामुळे पोलाद मंत्रालयाने या भागातील पोलाद उद्योगाला प्रोत्साहन दिल्यास विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या विदर्भात नव्या औद्योगिक गुंतवणुकीत भर पडेल तसेच रोजगारालाही चालना मिळेल, असेही दर्डा यांनी सुचविले. चौधरी वीरेंद्रसिंग यांनी दर्डा यांच्या विनंतीवर सहानुभूतीने विचार करण्याचे आश्वासन दिले. त्याचवेळी मागणीच्या अभावामुळे सध्या पोलाद उद्योग वाईट अवस्थेतून जात असल्याची कबुलीही दिली.
सर्व बँकांच्या थकीत कर्जात (एनपीए) पोलाद कंपन्यांचा वाटा २८ टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली. यापूर्वीच्या संपुआ सरकारने दिलेला हा वारसा असल्याचेही ते म्हणाले. आमचे सरकार विदर्भात पोलाद उद्योगाला पुनरुज्जीवित करतानाच प्रोत्साहन देणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जाधव न्यायाच्या प्रतीक्षेत
श्रीकांत जाधव या प्रामाणिक आयपीएस अधिकाऱ्याचा हरियाणात छळ होत असल्याकडे या भेटीत लक्ष वेधण्यात आले. जाधव यांची सध्या कर्नाल पोलीस प्रशिक्षण शाळेत नियुक्ती करण्यात आली आहे. ते हरियाणात पोलीस अधीक्षक असताना जनता दरबार भरवून लोकांच्या पोलीस विभागासंबंधी तक्रारी ऐकून घेत आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तडकाफडकी कारवाई करीत.
मुख्यमंत्र्यांचा फोन कॉल आल्यानंतरही मादक द्रव्य अमली पदार्थ तस्करांना सोडत नसत, अशी माहिती अनिस अहमद यांनी दिली. जाटांच्या आरक्षण आंदोलनाच्या काळात जाधव यांनी जमावाला शांत ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली होती, मात्र त्यामुळे राजकारण्यांचा राग ओढवून घेतला गेला. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या.
ते पत्नी आणि मुलांसह पळून गेल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. खरे तर जाधव हे अविवाहित आहेत. प्रथम त्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर कर्नालच्या प्रशिक्षण शाळेत दुय्यम दर्जाचे काम देण्यात आले. ते अद्यापही चौकशीतून निर्दोष मुक्त होण्याच्या प्रतीक्षेत आहेत, असेही अनिस अहमद यांनी सांगितले.
खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते : चौधरी वीरेंद्रसिंग हे मूळचे काँग्रेसी नेते असून खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते आहेत. ते उँचा कलान मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तीन वेळा हरियाणात कॅबिनेट मंत्री होते. हिस्सार लोकसभा मतदारसंघातूनही ते तीन वेळा निवडून आले. २0१0 च्या राज्यसभा निवडणुकीत त्यांनी ओ.पी. चौटाला यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. आॅगस्ट २0१४ मध्ये त्यांनी काँग्रेससोबतचे ४२ वर्षांपासूनचे नाते तोडून भाजपामध्ये प्रवेश केला. नोव्हेंबर २0१४ मध्ये ते पंचायतराज, पेयजल आणि स्वच्छता मंत्री बनले होते. या वर्षी जूनमध्ये राज्यसभेवर पुन्हा निवडून आल्यानंतर ते पोलादमंत्री बनले. त्यांचे निवासस्थान नेहमीच गदीर्ने फुललेले असून आतमध्ये जाण्यासाठी गर्दीतूनच वाट काढावी लागते.