फौजदारी कारवाईची नोटीस मागे घ्या!
By admin | Published: June 24, 2016 04:51 AM2016-06-24T04:51:02+5:302016-06-24T04:51:02+5:30
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील १ हजार २६३ शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्याची नोटीस शिक्षण आयुक्तांनी बजावली आहे
मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील १ हजार २६३ शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्याची नोटीस शिक्षण आयुक्तांनी बजावली आहे. मात्र, काहीही चूक नसताना अशा प्रकारे नोटीस बजावणे बेकायदेशीर आहे, असा दावा मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केला आहे. संघटनेने गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करत, या कारवाईचा विरोध केला आहे.
संघटनेचे सरचिटणीस प्रा. अनिल देशमुख म्हणाले की, ‘जून महिन्यात सुट्टीच्या कालावधीत काही शिक्षकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, जून महिन्यात नोटीस देताना त्याचे उत्तर ३१ मे २०१६पर्यंत देण्याचे आदेश आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मुळात शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या गोंधळाच्या परिस्थितीत सर्व संचालकांमध्ये समन्वय साधण्यासाठी आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. मात्र, तो हेतू साध्य न होता, आयुक्तांमुळे गोंधळात आणखी भर पडली आहे,’ असा आरोप देशमुख यांनी लावला आहे.
या आधी चार महिन्यांपूर्वी शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन केले होते.
त्या वेळी २२ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी बैठक घेऊन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका महिन्यांत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते.
याबाबत वारंवार संघटनेने स्मरणपत्रेही दिली आहेत. त्यामुळे अधिकारी मंत्र्यांचे ऐकत नाही का, असा सवाल शिक्षक संघटनेने उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)