व्हिडीओ- मुक्तीसंग्रामदिनी 9 लाखांवर मराठ्यांची क्रांती
By admin | Published: September 17, 2016 05:17 PM2016-09-17T17:17:30+5:302016-09-17T18:40:16+5:30
विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी काढण्यात आलेल्या मोर्चाला ९ लाखांवर रेकॉर्डब्रेक गर्दी
Next
विजय पाटील/ऑनलाइन लोकमत
हिंगोली,दि.17- विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी काढण्यात आलेल्या मोर्चाला ९ लाखांवर रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. एकीच्या बळावर शिस्तीचे दर्शन घडवत मराठा समाजाने काढलेल्या या मूकमोर्चाने शहर जणू ठप्पच झाले. महिला, युवती, विद्यार्थी पुरुष असा सर्वांनीच सहभाग घेतल्याने शहरातील सर्व प्रमुख मार्ग, मैदाने नुसती गर्दीने व्यापली होती.
औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व परभणीच्या मोर्चानंतर हिंगोलीच्या मोर्चाचे नियोजन झाले होते. यात लाखोंची गर्दी असावी, यासाठी तसेच नियोजनही केले होते. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी अथवा कायदा रद्द करा, मराठा समाजाला कुणबी समजून आरक्षण द्या, शेतक-यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही, असे धोरण राबवा, आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत द्या, पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत द्या आदी मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित केला होता. यासाठी सकाळी सहापासूनच हिंगोलीत बाहेरगावची वाहने दाखल होण्यास प्रारंभ झाला होता. आठनंतर ही गर्दी वाढत गेली. सकाळी दहा वाजताच जि.प.चे मैदान खचाखच भरले होते. अकरा वाजता तर मोर्चात सहभागी होण्यासाठी सगळ्याच रस्त्यांवर लोकांची एवढी गर्दी होती की, जि.प. शाळेच्या मैदानावर पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग वापरावे लागले.
जि.प. शाळेच्या मैदानावरून पुरुष मोर्चेकरी थांबले होते. बरोबर बाराच्या ठोक्याला मोर्चा विश्रामगृहाच्या मैदानातून निघाला. विद्यार्थिनी मोर्चात अग्रभागी होत्या. त्यानंतर या मोर्चात सिटी क्लब येथून महिला, युवती सहभागी झाल्या. त्यानंतर गर्दी वाढतच गेली. संपूर्ण रस्ता खचाखच भरलेला असतानाही गांधी चौकात सुरुवातीच्या मोर्चेकरी महिला पोहोचल्या तरीही सिटी क्लबच्या पलिकडेही महिलांची तेवढीच गर्दी होती.
जवळपास तीन ते चार किमीचे हे अंतर आहे. यात महिला व मुलींचाच सहभाग एवढा जास्त होता की, दोन ते तीन लाखांवर त्यांचीच संख्या होती. हळूहळू सगळीकडून शहराला मिळणारे रस्तेही ब्लॉक झाले. यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास मानवी साखळी केली होती. महिला स्वयंसेवकही मोठ्या संख्येने होते. ठिकठिकाणी ध्वनीक्षेपकावरून सूचना दिल्या जात होत्या. त्याचबरोबर एलईडीवरही विविध भागातील दृश्य दाखविली जात होती. नंतर जिल्हा कचेरीसमोर सुरू असलेला कार्यक्रम दाखविला जात होता. मोर्चात कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ काळे झेंडे, काळे टीशर्ट, मी मराठा नावाच्या टोप्या घातलेली पुरुष मंडळी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच विविध घोषणांची फलके, भगवे झेंडेही आणले होते. दुपारी एकच्या सुमारास ही मोर्चारुपी त्सुनामी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. महिलांना खटकाळी रेल्वे पटरीपर्यंत पुढे नेवून रस्त्यावर बसविण्यात आले होते. महिलाच बसस्थानकापर्यंत बसल्या होत्या. तर त्यानंतर मागे पुरुष मंडळी होती. जि.प.च्या मैदानावर असलेली पुरुष मंडळी तर तेथेच राहिली. शहरभर गर्दी झालेली असताना मोर्चेकºयांना जिल्हा कचेरीपर्यंत पोहोचताही आले नाही. वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यातील उशिराने आलेल्या मोर्चेकºयांना तेवढे जिल्हा कचेरीसमोरील नाईकनगरच्या मैदानावर बसता आले. हे मैदान तर खचाखच भरलेच होते. शिवाय आजूबाजूच्या इमारतींवरही हजारोंचा जमाव होता. मोर्चेकरी जागा मिळेल तेथे बसून अगदी शांतते मुलींनी केलेले निवेदन ऐकत होते.
जिल्हा कचेरीसमोर पाच ते सहा मुलींनी प्रथम जिजाऊंना वंदन केले. त्यानंतर निवेदनांचे वाचन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षणाची असलेली गरज, अॅट्रॉसिटीचा वाढता दुरुपयोग, आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या विधवेची दशा आणि समाजाच्या मागण्यांचे निवेदन वाचून दाखविण्यात आले. सर्व निवेदने वाचून झाल्यानंतर मुलींनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. यावेळी मराठा क्रांती मोर्चातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस ५0 हजार रुपयेही जिल्हाधिकाºयांमार्फत देण्यात आले.
या मोर्चासाठी सकल जैन समाज, मुस्लिम बांधव, सिंधी समाज, बागवान बिरादरी आदींनी पाण्याच्या पाऊचची व्यवस्था केली होती.
पोलिस बंदोबस्तही होता. मात्र त्यांना कुठे दंडुका हलवायचेही काम पडले नाही. मोर्चेकºयांतच एवढी स्वयंशिस्त होती की, अपुºया रस्त्यावरूनही वाहतुकीचे नियमन व मोर्चा या दोन्हींचे नियमन केले जात होते. हा मोर्चा पाहण्यासाठी जमलेल्या लोकांचीच ५0 हजारांवर गर्दी सर्वच रस्त्यांवरील आजूबाजूच्या इमारतींत असेल, असा अंदाज आहे. वाहनांच्या रांगा तर प्रत्येक मार्गावर साडेतीन ते चार किमी अंतरापर्यंत लागलेल्या होत्या. पार्किंगची व्यवस्थाही अपुरी पडली. अनेकांनी तेवढ्या अंतरावरून पायी चालत येईपर्यंत मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला होता.
पुढारी जि.प. मैनावरच राहिले
मोर्चाला ८ ते ९ लाखांची गर्दी झाल्याने जि.प. शाळेच्या मैदानावर मोर्चेकºयांसमवेत थांबलेली पुढारी मंडळी तेथेच राहिली. त्यांना जिल्हा कचेरीपर्यंत येताही आले नाही. सर्वपक्षीय पुढाºयांचा मोर्चात सहभाग दिसून आला.
मुख्यमंत्रीसाहेब मी श्रद्धा बोलतेय...
कोपर्डीतील अत्याचारग्रस्त मयत श्रद्धाचे आक्रंदण एका मुलीने व्यक्त केले. कोपर्डीच्या घटनेतील दुर्दैवाची बळी मी श्रद्धा बोलते आहे. मी आज तुमच्यात नाही. माझ्यासारख्या लाखो श्रद्धांना तुम्हाला जपायचंय. महाराष्ट्र मराठ्यांचा. मात्र याच महराष्ट्रात माझी ही अवस्था झाली. अन्यायी अत्याचारी सत्ता मुळासकट उखडून टाकणा-या शिवबांचा हा महाराष्ट्र. त्याच शिवबांच्या पुढची मी वारस आज खिन्न होवून तुमच्यासमोर बोलतेय. तुमच्याच मुलीसारखी मीही. अंगाखांद्यावर खेळणारी, आई-वडिलांच्या सुख-दुखात सहभागी होणारी मी. मला फुलायच होत, हसायच होत, शिकायच होत, खेळायच होत, शिकवायच होत, कल्पना चावला व्हायच होत... मात्र त्यांच्या घरट्यातील ही चिमणी आज तुमच्यातून उडून गेली एका नराधमाच्या क्रूरतेने. माझ आयुष्यच संपल... काय होता माझा गुन्हा... मी स्त्री जन्म घेतला हा गुन्हा? की मी स्त्रीत्व जपलय हा गुन्हा? सांगा ना! होय तुम्हालाच विचारतेय.. ती पहा माझी म्हातारी आजी.. माझ्यासाठी येथे आलीय... माझी माय सतत आठवण काढतेय माझी. मी ज्या वेदना सोसल्या त्याला शब्दच नाहीत. मी माझी एकाकी लढले. मी मुलगी म्हणून जन्मले हाच काय माझा गुन्हा. आज मी रडणार नाही. आता पुढे जाणार नाही. बाबा तुमच्या मनातील कालवा-कालव मला कळते. तुमचे मुकेपण ही तुमची ताकद आहे. तुमच्या डोळ्यांतील लालबुंद आगही मला दिसतेय. मी आता एकटी नाही. लाखो भाऊ माझ्या सोबतीला आहेत. माझ्या न्यायासाठी ते पाठीशीही आहेत. तुमची एकी हीच तुमची ताकद आहे, भल्या-भल्याच्या काळजाला चिरणारी समशेर आहे. तुम्हाला जिजाऊंच्या श्वासाची शप्पथ आहे. फक्त एवढेच म्हणते सरणावर तरी कशाला टाकता फुलांची रास... अरे तुमचीच बहीण ना मी, नाही होत का तुम्हाला त्रास हे शब्द ऐकूण प्रत्येकाचे मन हेलावून गेले. लाखोंचा समुदाय अगदी स्तब्ध झाला होता.
पाहा व्हिडीओ-