रोडरोमिओंना चिडीमार पथकाचा हिसका
By admin | Published: July 20, 2016 06:43 PM2016-07-20T18:43:03+5:302016-07-20T18:43:03+5:30
कोपर्डी घटनेनंतर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक सजग झाली असून रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीसांचे चिडीमार पथके सक्रिय करण्यात आले आहेत.
ऑनलाइन लोकमत
बीड, दि.20 - कोपर्डी घटनेनंतर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक सजग झाली असून रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीसांचे चिडीमार पथके सक्रिय करण्यात आले आहेत. अंबाजोगाईत पथकाने पहिल्याच दिवशी २५ रोडरोमिओंना अटक केली.
बीड शहरासह जिल्ह्यात रोडरोमिओंचा सुळसुळाट गेली काही दिवसांपासून वाढला आहे. शहरात हे पथक कार्यरत असले तरी ते केवळ नावापुरतेच उरले होते. या पथकालाही पोलीस अधिक्षकांनी अशा तरुणांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अंबाजोगाईत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गंदम यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सामावेश असणारे खास चिडीमार पथक तयार केले. या पथकाने मंगळवारी पहिल्याच दिवशी शहरात विविध ठिकाणी मुलींची छेडछाड करणाऱ्या २५ तरूणांना अटक करुन न्यायालयासमोर उभे केले. या तरूणांना न्यायालयाने प्रत्येकी १२०० रूपयांचा दंड ठोठावला.
पाटोदा पोलीसांनी सध्या वेगळाच उपक्रम हाती घेतला आहे. छेडछाडीला कंटाळून शाळेत जाणेच सोडून दिलेल्या मुलींचे पोलीस घरी जाऊन समुपदेशन करत आहेत. पोलीस निरीक्षक अजिनाथ रायकर यांनी या संदर्भात शाळा महाविद्यालयातील शिक्षक-प्राचार्यांची एक बैठकही बुधवारी घेतली. मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले. इतकेच नाही तर पकडलेल्या रोड रोमिओला सोडविण्यासाठी कोणी आले तर त्यालाही सहआरोपी करण्यात येणार असल्याचे रायकर यांनी सांगितले.