निर्यात थांबल्याने तांदळाचे भाव गडगडले; इराणकडून खरेदी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 06:02 AM2019-12-15T06:02:53+5:302019-12-15T06:03:07+5:30
पावसामुळे तांदळाची ‘बंपर’ आवक
विजयकुमार सैतवाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : इराणकडून भारत कच्च्या तेलाची (क्रूड आॅईल) खरेदी करीत नसल्याने इराणनेही भारतीय तांदळाची खरेदी थांबविली आहे. त्यामुळे भारतातून तांदळाची निर्यात होत नसल्याने व त्यात यंदा अतिपावसामुळे तांदळाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने यंदा त्याचे भाव २५ ते ३० टक्क्यांनी गडगडले आहे. यात बासमती तांदळाचे भाव ५० ते ७५ रुपये प्रती किलोवर आले आहेत.
भारतातून इराण, नेपाळ, मलेशिया, दुबईसह अफ्रिकी देशात मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात होते. या निर्यात होणाऱ्या तांदळापैकी ५० टक्के (दरवर्षी तब्बल ८ ते १० लाख टन) तांदळाची निर्यात एकट्या इराणमध्ये होते. भारतीय तांदळाचा प्रमुख खरेदीदार देश असलेल्या इराणकडून भारताने सध्या कच्च्या तेलाची (क्रूड आॅईल) खरेदी थांबविली आहे. कच्च्या तेलाच्या बदल्यात इराण भारताकडून तांदूळ घेतो. कच्च्या तेलाची खरेदीच होत नसल्याने इराणनेही भारतीय तांदूळ खरेदीला नकार दिला आहे.
मध्यमवर्गीयांच्या घरीही दरवळणार ‘बासमती’चा सुगंध
चिनोर, कालीमूछ, सुगंधी मसुरी, कोलम अशा दर्जाच्या अथवा त्याही पेक्षा कमी भावाच्या तांदळाची खरेदी करणाºया मध्यमवर्गीय ग्राहकांच्याही घरी बासमती तांदुळाचा सुगंध दरवळू शकतो, असे चित्र यंदा निर्माण झाले आहे. एरव्ही १०० ते १५० रुपये प्रती किलोने विक्री होणाºया बासमती तांदळाचे भाव सध्या ५० ते ७५ रुपये प्रती किलोवर आले आहेत. या सोबतच ३५ ते ५० रुपये प्रती किलोने विक्री होणाºया चिनोर व इतर तांदुळाचेही भाव ३२ ते ४२ रुपये प्रती किलोवर आले आहेत. दुसरीकडे यंदा चांगल्या पावसामुळे तांदुळाची बंपर आवक झाली आहे.
भाव खाली आले
सध्या जळगावच्या बाजारपेठेसह राज्यातही विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, तूमसरसह छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी भागांतून तांदळाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. त्यात निर्यात थांबल्याने तांदळाचा मोठा साठा देशात उपलब्ध झाला आहे. परिणामी, आवक वाढल्याने तांदळाचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांनी खाली आले आहेत.