धान्याचे उत्पादन घटणार?
By admin | Published: November 15, 2015 02:19 AM2015-11-15T02:19:39+5:302015-11-15T02:19:39+5:30
हवामान बदलाचा फटका यंदाही थंडीला बसणार असून, हिवाळ्यात थंडीचे प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे, असे भाकीत हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविले आहे.
पुणे : हवामान बदलाचा फटका यंदाही थंडीला बसणार असून, हिवाळ्यात थंडीचे प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे, असे भाकीत हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविले आहे. रब्बीच्या अनुषंगाने आवश्यक असणारी थंडी यंदा कमी पडणार असल्यामुळे, त्याचा पिकांवर परिणाम जाणवण्याची शक्यता असल्याने, त्यामुळे धान्याच्या उत्पादनात घट होण्याची भीती आहे, अशी माहिती साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलामुळे दोन वर्षांपासून थंडी जाणवलीच नाही आणि यंदाही थंडी कमीच राहील, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली. जागतिक तापमान वाढीमुळे काही वर्षांपासून हवामानात बदल होत आहे. दोन वर्षांत जाणवण्याइतकी थंडी पडलीच नाही. ढगाळ वातावरण आणि अवेळी पाऊस, अशी स्थिती राहिली आहे. यंदाही डिसेंबर अखेरपर्यंत काही प्रमाणात अवेळी पाऊस पडेल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नाशिकच्या भागातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात होते. अवेळी पावसाचा त्यावर दोन-तीन वर्षांपासून परिणाम होत आहे.
पूर्वी नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे ४ महिने थंडी असायची. १२० दिवसांची थंडी रब्बीतील पिकांसाठी योग्य ठरायची. ४० वर्षांपूर्वी डिसेंबर अखेरच्या सप्ताहात प्रचंड प्रमाणात थंडी असायची. मात्र, आता सर्वाधिक थंडीचा काळ म्हणून जानेवारीचा दुसरा-तिसरा आठवडा गृहित धरला जातो. हवामान बदलाचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.
अचानक जास्त थंडी पडणे किंवा एकदम थंडी कमी होणे, हे रब्बीसाठी घातक आहेत. कोणतीही टोकाची स्थिती पिकांना अपायकारक आहे. ७ जानेवारी २०११ रोजी नगरमध्ये १.६ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले होते. त्याचवेळी नाशिकमध्ये ० अंश सेल्सियस तापमान होते, याचा द्राक्षांच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. गव्हाच्या पिकाला साधारणत: १२०-१३० दिवस थंडीचा कालावधी लागतो. या संदर्भात ‘डिग्री डेट’ ही संकल्पना वापरली जाते. प्रत्येक दिवसाला कमाल-किमान तापमानात १ अंशानेही बदल झाला, तरी त्याचा पिकावर परिणाम होतो. गेल्या १५ वर्षांचा कालावधी पाहता, गव्हाला चांगली थंडीच मिळालेली नाही. १ अंशानेही कमाल तापमान वाढले की उष्णता मिळून १०० दिवसांतच पीक तयार होते, पण त्यातील उत्पादनता घटते, दाणे कमी होतात. गव्हाचे क्षेत्र वाढविण्याऐवजी ज्वारी, हरभरा असे क्षेत्र घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)