डोंबिवली: रिक्षावाल्याकडून भाडं नाकारल्याचा जाब विचारणा-या महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 04:57 PM2017-08-18T16:57:46+5:302017-08-18T17:01:48+5:30
दोन तरूणांच्या धाडसामुळे रिक्षाचालकाचा अपहरणाचा प्रयत्न फसला. या दोघांनी रिक्षाचा पाठलाग करुन...
डोंबिवली, दि. 18 - डोंबिवलीत रिक्षाचालकाने भर दिवसा महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानपाडा पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. दोन तरूणांच्या धाडसामुळे रिक्षाचालकाचा अपहरणाचा प्रयत्न फसला. या दोघांनी रिक्षाचा पाठलाग करुन या महिलेची सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्व येथील मनीषा राणे स्टेशनला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यासाठी त्यांनी एक रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. पण रिक्षाचालकाने स्टेशनला जाण्यास नकार दिला आणि तो पुढे जाऊन पुन्हा प्रवाशांची वाट पाहात होता. त्यामुळे मनीषा यांनी त्याला जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकाने मनीषा आणि त्यांची मैत्रिण अमिता हेदळकर यांना रिक्षात ओढत रिक्षा पळवली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळलेल्या मनीषा आणि त्यांच्या मैत्रिणीने आरडाओरडा करायला सुरूवात केली.
त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून दोन बाईकस्वारांनी त्या रिक्षाचा पाठलाग केला आणि रिक्षा चालकाला पकडलं व दोघींची सुटका केली.
शंकर विसलवाथ असं या रिक्षाचालकाचं नाव आहे. त्याला मानपाडा पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.