नाशिकमध्ये पोलिसाच्या अंगावर घातली रिक्षा
By admin | Published: September 7, 2016 11:50 AM2016-09-07T11:50:31+5:302016-09-07T11:50:31+5:30
रिक्षा अंगावर घालून पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. रिक्षाचालकासह पाच जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
>- ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 7 - कल्याणमध्ये पोलीस निरीक्षकाला तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये पोलिसाच्या अंगावर रिक्षा घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रिक्षा अंगावर घालून पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. रिक्षाचालकासह पाच जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमध्येही पोलिसावर हल्ला झालेली ही दुसरी घटना आहे.
पोलीस कर्मचारी घोलप तपोवन चौफुलीवर नाकाबंदीसाठी कार्यरत होते. यावेळी रिक्षाचलकाला त्यांनी थांबायला सांगितलं असतानाही रिक्षाचालकाने न थांबता रिक्षा थेट घोलप यांच्या अंगावर घातली. सुदैवाने घोलप थोडक्यात बचावले आहेत. मुजोर रिक्षाचालक सागर नाईकसह नितीन वाडकर, रोहित नाईक, रोहित हळदणकर, ज्ञानेश्वर वाघमारे यांच्यावर उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपायास धक्काबुक्की
दरम्यान मंगळवारीदेखील पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आली होती. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत आयुक्तालयामार्फत नियुक्त करण्यात आलेले पोलीस शिपाई भाऊसाहेब विश्राम चत्तर (४३) यांना संशयितांनी अरेरावी करत धक्काबुक्की केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चत्तर हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पॉइंट ड्यूटीवर असताना संशयित आनंद अशोक तसांबड (२८, रा. काठेगल्ली) हा युवक आपल्या दोघा मित्रांसह दुचाकीवरून जात होता. यावेळी चत्तर यांनी त्यास हटकले व कागदपत्रांची चौकशी केली. यावेळी संशयित तसांबड यांनी त्यांना अरेरावी करत धक्काबुक्की केली.