रिक्षा परमिटसाठी आठवी पास हवीच
By Admin | Published: February 9, 2015 05:12 AM2015-02-09T05:12:35+5:302015-02-09T05:12:35+5:30
रिक्षा परमिटसाठी आठवी पासची अट शिथिल करणार नाही. परमिट व परवाना हवा असेल, त्या रिक्षाचालकांनी यशवंतराव चव्हाण
कोल्हापूर : रिक्षा परमिटसाठी आठवी पासची अट शिथिल करणार नाही. परमिट व परवाना हवा असेल, त्या रिक्षाचालकांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अथवा प्रौढ साक्षरता वर्गात प्रवेश घ्यावा व किमान दहावी पास व्हावे, अशा कानपिचक्या परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रिक्षाचालक संघटनांना दिल्या.
ते रविवारी शासकीय विश्रामगृह येथील परिवहन कार्यालयाच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील विविध रिक्षाचालक संघटनांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन रावते यांना देण्यात आले. या निवेदनात परमिटसाठीचे धोरण शासनाने बदलावे; यामध्ये आठवी पासची अट शिथिल करावी, ही प्रमुख मागणी होती. सर्व नागरिक साक्षर व्हावेत म्हणून राज्य शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. त्यामुळे ही मागणी मी मान्य करणार नाही. रिक्षाचालकांनी व्यवसायातून वेळ काढून मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन दहावी पास व्हावे, असा सल्ला रावते यांनी रिक्षाचालकांना दिला.
अवैध वाहतुकीबाबत येत्या आठ दिवसांत बैठक बोलाविण्यात येईल. रिक्षा पासिंगबाबत प्रतिदिन पाच रुपये लेट फी आकारली जाते. ती कमी करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच रिक्षाचालकांनीही आपले वाहन सुस्थितीत ठेवावे व आपल्या गाडीचा विमा पूर्ण उतरावा. त्याचा फायदा प्रवाशांनाही मिळेल, अशी सूचना त्यांनी केली. (प्रतिनिधी)