रिक्षाचालकांना हवी शेअरमध्ये भाडेवाढ

By admin | Published: August 25, 2016 03:45 AM2016-08-25T03:45:06+5:302016-08-25T03:45:06+5:30

प्रवाशांबरोबर वाद होत असल्याचे कारण देत शहरातील रिक्षाचालकांनी शेअरच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी केली आहे.

Rickshaw puller fare hike in want stock | रिक्षाचालकांना हवी शेअरमध्ये भाडेवाढ

रिक्षाचालकांना हवी शेअरमध्ये भाडेवाढ

Next


कल्याण : सुट्या पैशांवरून प्रवाशांबरोबर वाद होत असल्याचे कारण देत शहरातील रिक्षाचालकांनी शेअरच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात रिक्षा-टॅक्सी चालक- मालक असोसिएशनने कल्याण आरटीओला निवेदन दिले आहे. त्यावर, आरटीओ काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाडे नाकारणे, उद्धट बोलणे, असे अनुभव प्रवाशांना रिक्षाचालकांकडून नेहमीच येतात. यात सातत्याने वाद होण्याचे प्रकारही घडतात. सध्या वाहतूककोंडीमुळे रिक्षाचालक आणि प्रवासी बेजार झाले आहेत. त्यातच शेअर भाड्यासाठी सुटे पैसे देण्यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत असल्याकडे असोसिएशनने लक्ष वेधले आहे. सध्या शेअर रिक्षाचे भाडे पहिल्या टप्प्यासाठी अंतरानुसार प्रतिप्रवासी आठ, साडेआठ तसेच साडेनऊ रुपये आकारले जातात. त्यामुळे सुट्या पैशांवरून होणारे वाद टाळण्यासाठी शेअर रिक्षा प्रवासपद्धतीत पहिला टप्पा जिथे प्रतिप्रवासी दर भाडे आठ रुपये आकारले जाते, तेथे १० रुपये भाडे केल्यास रिक्षाचालकांना प्रोत्साहन मिळेल. यामुळे जवळच्या अंतरावरील प्रवासी भाडे नाकारण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल. शिवाय, प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होऊन सुट्या पैशांवरून होणारे वाद टळतील, असा असोसिएशनचा दावा आहे. याबाबत, त्यांनी आरटीओला निवेदन दिले आहे.
>वाढीव भाडे आकारण्यास सुरुवात
रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे रोष असताना असोसिएशनने सुचवलेली भाडेवाढ कितपत प्रवाशांच्या पचनी पडेल, याबाबतही साशंकता आहे.
कल्याणमध्ये काही रिक्षाचालकांनी भाडेवाढ झाली नसतानाही बेकायदा वाढीव भाडे आकारायला प्रारंभ केल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. यावर, रिक्षा असोसिएशनने मात्र अशी कोणतीही भाडेवाढ झाली नसल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात आरटीओ अधिकारी नंदकिशोर नाईक यांच्याशी संपर्क साधला असता भ्रमणध्वनी बंद होता.
>सुट्या पैशांवरून प्रवासी आणि रिक्षाचालकांत वाद होत असल्याने भाडेवाढीचा प्रस्ताव दिला आहे. हकीम समितीच्या शिफारशींनुसार पहिल्या टप्प्यातील शेअरचे भाडे १० रुपये होते. परंतु, भाडेवाढ झाली, त्या वेळी प्रवाशांना जादा भुर्दंड पडू नये, म्हणून दोन रुपये कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. परंतु, सध्याचे तंटे पाहता हकीम समितीच्या अहवालानुसारच भाडेवाढ आम्ही मागितली आहे.
- संतोष नवले, सहसचिव,
रिक्षा-टॅक्सी चालक-मालक असोसिएशन.

Web Title: Rickshaw puller fare hike in want stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.