रिक्षाचालकाकडून पुन्हा एसटीचालकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2017 03:08 AM2017-02-28T03:08:17+5:302017-02-28T03:08:17+5:30
ठाण्यात घडलेली घटना ताजी असतानाच सोमवारी कल्याणमध्येही रिक्षा चालकाने एसटी चालकाला मारहाण केली.
कल्याण : रिक्षाचालकाच्या मारहाणीत एसटी चालकाचा मृत्यू झाल्याची भिवंडीतील घटना आणि त्यापाठोपाठ ठाण्यात घडलेली घटना ताजी असतानाच सोमवारी कल्याणमध्येही रिक्षा चालकाने एसटी चालकाला मारहाण केली. बस बळवण्याच्या जागी उभी केलेली रिक्षा पुढे घेण्याच्या वादातून हा प्रकार घडला. यामुळे कल्याण-डोंबिवलीत भररस्त्यात ठिकठिकाणी बेकायदा सुरू असलेल्या रिक्षातळांचा मुद्दा गंभीर बनला आहे.
पालिकेचा ढिसाळपणा, पोलिसांचे दुर्लक्ष, आरटीओचा नसलेला बचक हे सारे मुद्दा यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहेत. मारहाणीच्या घटनेचे वृत्त बस आगारात समजताच बसचालक-वाहकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान पोलिसांनी रिक्षाचालक सलीम अब्दुल पठाण (३०, रा. कल्याण) याला अटक केली आहे.
अलिबागहून कल्याणला आलेली एसटी बस दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्याण आगारात प्रवेश करत होती. तेव्हा बसचालक सुरेश भोसले (४३, रा. कोनगाव) यांनी पुढे उभी असलेली रिक्षा तिच्या चालकाला पुढे घेण्यास सांगितले. त्यावरून त्यांचा वाद झाला. त्यातून रिक्षा चालकाने बसचालक सुरेश भोसले यांना मारहाण केली. त्याने बोटाचा चावा घेतल्याचेही सुरूवातीला सांगितले जात होते. मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही.
भोसले यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एसटी स्थानक, केडीएमटी बसचे थांबे येथे दिवसभर रिक्षांची बेकायदा वर्दळ असते. रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्याचा रिक्षाचालकांनी बेकायदा ताबा घेतला आहे. भररस्त्यात तीन-तीन रांगा करून प्रवासी भरले जातात. हे सर्व वाहतूक पोलिसांच्या डोळ््यादेखत सुरू असूनही ते कारवाई करत नसल्याचा प्रवाशांचा, वाहनचालकांचा आरोप आहे.
एसटी चालकांप्रमाणेच अन्य वाहनचालकांनाही या रस्त्यावरून जाण्यास पुरेशी जागा नसते. त्याबाबत रिक्षाचालकांना काहीही सांगितले तरी ते हमरीतुमरीवर येतात. एकत्र येत शिवीगाळ-मारहाण करतात आणि पोलीस त्यात काहीही करत नाहीत, असा वाहनचालकांचाही आरोप आहे. (प्रतिनिधी)
>पोलिसांकडून न्यायालयाचा अवमान
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे सचिव महादेव म्हस्के यांनी या मारहाणीच्या घटनेचा निषेध केला आहे. भिवंडीतील दुदैवी घटनेनंतर बस आगाराच्या प्रवेशद्वारावर जागा अडवून उभ्या असलेल्या रिक्षांचा मुद्दा पुढे आला. रिक्षांमुळे बस चालकांना व प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत पाठपुरावा केला गेला. त्यानंतरही परिस्थिती बदललेली नाही, हेच या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले, असे म्हस्के यांनी सांगितले. बस स्थानक परिसरापासून २०० मीटर अंतरावर कोणतेही खाजगी वाहन थांबवू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. पण त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंत म्हस्के यांनी व्यक्त केली.