नवी मुंबईत रिक्षाचालकांची गुंडगिरी

By admin | Published: June 11, 2017 02:37 AM2017-06-11T02:37:26+5:302017-06-11T02:37:26+5:30

रिक्षाचालकांनी एनएमएमटी बसचालकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घणसोलीत घडली. तर मारहाण होत असलेल्या चालकाच्या मदतीला गेलेल्या इतर

Rickshaw pullers in Navi Mumbai | नवी मुंबईत रिक्षाचालकांची गुंडगिरी

नवी मुंबईत रिक्षाचालकांची गुंडगिरी

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : रिक्षाचालकांनी एनएमएमटी बसचालकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घणसोलीत घडली. तर मारहाण होत असलेल्या चालकाच्या मदतीला गेलेल्या इतर तिघांनाही मुजोर रिक्षाचालकांनी मारहाण केली आहे. वाहतुकीला अडथळा होत असल्यामुळे रस्त्यावरील रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन रिक्षाचालकांना अटक केली आहे.
शाब्दिक वादातून रिक्षाचालकांनी एनएमएमटीच्या बसचालकाला बसमधून खाली खेचून भररस्त्यात जबर मारहाण केल्याचा प्रकार घणसोली येथे घडला आहे. या वेळी दुसऱ्या दोन बसच्या चालकांनी त्याच्या मदतीला धाव घेतली असता, त्यांनाही मारहाण झाली आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी राजू वाशिवले, दादा गुंडेकर या रिक्षाचालकांना अटक केली आहे. त्यांचा तिसरा साथीदार व एक कारचालक यांचा पोलीस शोध घेत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास मार्ग क्रमांक २०ची बस घेऊन एनएमएमटीचालक फैयाज पठाण करावेच्या दिशेने चालले होते. घणसोली डी-मार्टपासून काही अंतरावरच सिम्पलेक्स येथे चौकात वळणावर रिक्षा उभ्या होत्या. यामुळे मार्गात अडथळा झाल्याने पठाण यांनी रिक्षाचालकाला रिक्षा (एमएच ४३ एसी ५४१९) बाजूला घेण्यास सांगितले. या वेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाल्यामुळे रिक्षाचालकाने बसमध्ये घुसून पठाण यांचा शर्ट फाडून शिवीगाळ केली. यानंतरही पठाण यांनी दुर्लक्ष करून बस पुढे नेली असता, तिघांनी रिक्षातून त्यांचा पाठलाग केला. रेल्वे स्थानकासमोरील मार्गावर समोरून दोन बस आल्यामुळे पठाण यांनी बस थांबवली असता, त्या तिघांनी पुन्हा बसमध्ये घुसून पठाण यांना मारहाण केली. तसेच त्यांना बसमधून खाली खेचून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. पठाण यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत रस्त्यालगतची सायकल फेकून मारल्याने ते गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले. या वेळी गोपाळ वाघमारे व गौरव कोल्हे या दोघा एनएमएमटी चालक व सागर मंचरे या वाहकाने त्यांच्या मदतीला धाव घेतली; परंतु मुजोर रिक्षाचालकांनी त्यांनाही मारहाण केली.
हा प्रकार सुरू असतानाच कारमधून आलेली व्यक्तीही बसचालकांना शिवीगाळ करत असताना, एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ काढला. ही बाब कारचालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने सदर व्यक्तीलाही धमकावत मारहाण केली. भररस्त्यात हा संपूर्ण प्रकार सुरू असताना बघ्यांपैकी एकानेही रिक्षाचालकांच्या गुंडगिरीला विरोध करण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर संतप्त बसचालकांनी काही वेळासाठी घटनास्थळीच चक्का जाम करून मारहाणीचा निषेध केला. त्यानंतर सुमारे एका तासाने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याची खंत एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

तक्रारीनंतरही बोगस रिक्षांना अभय
घणसोली रेल्वे स्थानकासमोर, पंचवटी चौकात तसेच डी-मार्टसमोर रिक्षांचे अवैध थांबे तयार झाले आहेत. त्या सर्व ठिकाणी सर्वाधिक बोगस रिक्षा थांबलेल्या असतात. यामुळे होत असलेल्या वाहतूककोंडीची तक्रार सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील, निखिल म्हात्रे यांच्यासह अनेकांनी आरटीओ, वाहतूक पोलीस यासह ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवरही केलेली आहे. त्यानंतरही बोगस रिक्षांवर जप्तीची कारवाई होत नसल्यामागे मोठे अर्थकारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुन्हेगार बनले रिक्षाचालक
राजा वाशिवले याच्यावर यापूर्वीही दंगलीचा गुन्हा दाखल आहे. घणसोली स्थानकाबाहेर काही महिन्यांपूर्वी रिक्षाचालकांच्या दोन गटांत झालेल्या दंगलीतही त्याचा समावेश होता. परवाना नसलेल्या रिक्षाचालकांचा घणसोली विभागातला तो प्रमुख असल्याचे समजते.

एनएमएमटी कर्मचारी बंदच्या पवित्र्यात
यापूर्वी मुंबईतही एनएमएमटीच्या बसचालकाला जबर मारहाणीची घटना घडलेली आहे. त्यामुळे बसचालकांना मारहाण कारणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी एनएमएमटीचे कर्मचारी बंदच्या पवित्र्यात आहेत. यासंबंधी घणसोली डेपोत बैठकही घेण्यात आली. त्यानुसार सोमवारी सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन पोलीस ठाण्यावर घेराव घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
बसचालकांना मारहाण झालेले ठिकाण पोलीस चौकीपासून अवघ्या शंभर ते सव्वाशे मीटर अंतरावर आहे; परंतु बसचालकांना मारहाण सुरू असतानाही वेळीच त्यांना पोलिसांची मदत मिळू शकली नाही. काहींनी १०० नंबरवरदेखील फोन केला; परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मारहाणीच्या निषेधार्थ बसचालकांनी चक्का जाम केल्यानंतर सुमारे एक तासाने कोपरखैरणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Rickshaw pullers in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.