बीकेसीत रिक्षाची हातगाडीला धडक
By admin | Published: July 11, 2017 02:39 AM2017-07-11T02:39:31+5:302017-07-11T02:39:31+5:30
रिक्षाने हातगाडीला दिलेल्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रिक्षाने हातगाडीला दिलेल्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला. रविवारी हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे.
सुरज लालबहादूर मौर्या (२०) असे या अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. बीकेसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रामचरण कैरी (२०) हे त्यांचा सहकारी रामसेवक यादव (६०) यांच्यासह हातगाडी ढकलत सांताक्रूझ पूर्वच्या अग्निशमन दलाकडून रस्त्याच्या कडेने निघाले होते. त्या वेळी मौर्या हा भरधाव वेगाने गाडी चालवत या मार्गाने आला. याच दरम्यान त्याने यादव यांना रिक्षाने जोरदार धडक दिली. या धडकेत यादव गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरने तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत बीकेसी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मौर्याला ताब्यात घेतले. तर यादव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मौर्या हा गाडी चालवताना नशेत होता का, याची चौकशी पोलीस करत आहेत.