अंधेरीत अज्ञात व्यक्तींकडून रिक्षाची जाळपोळ, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर रिक्षा जाळल्याचा संशय
By admin | Published: March 11, 2016 12:06 AM2016-03-11T00:06:33+5:302016-03-11T00:06:33+5:30
रस्त्यालगत उभी असलेल्या एका रिक्षाला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची घटना गुरुवारी रात्री अंधेरी आरटीओ बाहेर घडली. ही रिक्षा मनसे कार्यकर्त्यांनीच जाळल्याचा संशय पोलिसांना आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.११- रस्त्यालगत उभी असलेल्या एका रिक्षाला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची घटना गुरुवारी रात्री अंधेरी आरटीओ बाहेर घडली. ही रिक्षा मनसे कार्यकर्त्यांनीच जाळल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार अंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
एका उदयोगपतीला कोट्यावधींचा नफा मिळवून देण्यासाठी ७० हजार रिक्षांचे परवाने देण्याचे काम राज्य शासनाकडून सुरु असल्याचा आरोप बुधवारी राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे रस्त्यावर नवीन रिक्षा दिसल्यास रिक्षा चालकास आणि प्रवाशाला बाहेर काढून ती रिक्षा जाळून टाका असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. याचाच परिणाम गुरुवारी रात्री अंधेरी येथे पहायला मिळाला. रत्यालगत उभी असलेल्या एका रिक्षाला काही अज्ञात व्यक्तींनी रात्री साडे दहाच्या सुमारास आग लावत पळ काढला. ही बाब काही स्थानिक रहिवाशांनी पाहताच त्यांनी अग्नीशामक दलास घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या अग्नीशामक जवानांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र तो पर्यंत रिक्षा पुर्णपणे जळून खाक झाली होती. याबाबत अंबोली पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)