रिक्षा-टॅक्सी चालकांचेही आता येणार ‘अॅप’
By admin | Published: October 9, 2016 02:12 AM2016-10-09T02:12:54+5:302016-10-09T02:12:54+5:30
ओला आणि उबेर या खासगी टॅक्सीमुळे सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र अधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने ओला-उबरला टक्कर
मुंबई : ओला आणि उबेर या खासगी टॅक्सीमुळे सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र अधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने ओला-उबरला टक्कर देण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी देखील स्वत:चा अॅप तयार केला असून दसऱ्यापासून ( दि.११) ही सेवा कार्यान्वित होणार आहे.
मुंबईकरांना अनेक वर्षापासून चांगली सेवा देणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांवर सध्या ओला-उबरमुळे उपासमारीची वेळी आली आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी अनेक आंदोलने देखील केली. मात्र शासनाकडून या खासगी कंपन्यांवर काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी त्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत स्वत:चे अॅप तयार केले आहे. शिव वाहतूक सेनेने त्यासाठी पुढाकार घेतला असून त्याद्वारे ओला-उबर प्रमाणेच यापुढे रिक्षा आणि टॅक्सी देखील सुविधा देणार आहेत. मंगळवारी दसऱ्याच्या मुहुर्तावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सेवेचे उदघाटन होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते हाजी अरफात शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तरतूद
या नवीन तंत्रज्ञानामध्ये केवळ अधिकृत परवानाधारक रिक्षा-टॅक्सी चालकानाच समाविष्ट केले जाणार आहे. शिवाय राज्य प्रादेशिक परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या मीटरनुसारच प्रवासी भाडे आकारणी करणार आहे. विशेष म्हणजे महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या अॅपमध्ये प्राधान्याने उपाययोजना केलेल्या आहेत.
- ओला उबेर या सारख्या खासगी कंपन्यांकडून १ किमी अंतराच्या आतील जवळचे भाडे स्वीकारले जात नाही. मात्र शिव वाहतूक सेनेच्या या सुविधेद्वारे सर्व प्रकारचे प्रवासी भाडे स्वीकारले जातील.
तसेच अनेकदा प्रवाशांकडून जादा पैसे आकारण्याचेही प्रकार घडतात. मात्र याबाबतीत सदर अॅप सेवेमध्ये पूर्णपणे पारदर्शकता असणार आहे. याशिवाय ट्रक-टेम्पोचालक, अवजड वाहने यांना देखील या माध्यमातून वाहतूक व्यवसाय उपलब्ध होणार असल्याचे शेख यांनी सांगितले आहे.