रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात प्रत्येकी १ रुपया वाढ
By admin | Published: May 12, 2015 02:45 AM2015-05-12T02:45:12+5:302015-05-12T02:45:12+5:30
हकिम समितीने केलेल्या शिफारसीनुसार रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात एक रुपया वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने (मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण) सोमवारी
मुंबई - हकिम समितीने केलेल्या शिफारसीनुसार रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात एक रुपया वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने (मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण) सोमवारी झालेल्या बैठकीत घेतला. ही भाडेवाढ १ जूनपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल,कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मिरा-भार्इंदर, उल्हासनगरसह अन्य एमएमआरटीए क्षेत्रात लागू केली जाणार आहे. त्यामुळे रिक्षाचे भाडे १७ वरुन १८ रुपये तर टॅक्सीचे भाडे २१ वरुन २२ रुपये होईल. तत्पूर्वी हकिम समितीच्या वैधतेला मुंबई ग्राहक पंचायतीने यापूर्वीच हायकोर्टात आव्हान दिल्याने राज्य सरकारला ही भाडेवाढ लागू करण्यासाठी हायकोर्टाकडूनही परवानगी घेणे आवश्यक असल्याने येत्यातीन ते चार दिवसांत हायकोर्टातही या भाडेवाढीची माहीती सादर केली जाणार आहे. वाढणारे इंधनाचे दर, देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च आणि महागाईचा विचार करता प्रत्येक वर्षाच्या १ मेपासून रिक्षा आणि टॅक्सींच्या भाड्यात वाढ करण्याची शिफारस हकिम समितीकडून करण्यात आली आहे. ही शिफारस २७ जुलै २०१२ रोजी केल्यावर आॅक्टोबर २०१२ पासूनच रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात वाढ करण्यात आली होती. त्या वेळी रिक्षाचे भाडे १५ रुपये आणि टॅक्सीचे भाडे १९ रुपये करण्यात आले होते. हकिम समितीच्या शिफारसीनुसार २0१३ च्या मे महिन्यात भाडेवाढीसाठी रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून पुन्हा प्रयत्न करण्यात आले होते. मात्र या नविन भाडेवाढीविरोधात ग्राहक पंचायतीने धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने दिलेल्या मंजुरीनंतर आॅगस्ट २0१४ पासून हकिम समितीच्या शिफारसीनुसार रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे दोन रुपयांनी वाढविण्यात आले. त्यामुळे रिक्षाचे भाडे १७ तर टॅक्सीचे भाडे २१ रुपये झाले होते. प्रत्येक वर्षी मे महिन्यात हकिम समितीच्या शिफारसीनुसार भाडेवाढ होत असल्याने यंदाही भाडेवाढ मिळावी अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सी संघटनांची होती. त्यानुसार सोमवारी एमएमआरटीएच्या झालेल्या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात प्रत्येकी एक रुपया वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जूनपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.
आॅक्टोबर २0१२ पासून नविन भाडेवाढ हकिम समितीनुसार करण्यात आली होती. त्यानंतर २0१३ च्या मे महिन्यात भाडेवाढ मिळावी म्हणून रिक्षा आणि टॅक्सी संघटनांकडून प्रयत्न करण्यात्२ा आले होते.
मात्र २0१२ च्या आॅक्टोबर महिन्यात भाडेवाढ झाल्यावर त्यानंतरच्या २0१३ च्या नविन भाडेवाढीविरोधात ग्राहक संघटनेकडून न्यायालयात धाव घेण्यात आली होती. मात्र न्यायालयाने या भाडेवाढीला मंजुरी दिली आणि आॅगस्ट २0१४ रोजी नविन भाडेवाढ लागू झाली. परंतु जेव्हा नविन भाडेवाढ लागू कराल तेव्हा न्यायालयात त्याची माहीती द्यावीच लागेल, असे न्यायालयाने सांगितले होते. एमएमआरटीएकडून येत्या तीन ते चार दिवसांत न्यायालयात भाडेवाढीची माहिती सादर केली जाईल.