रिक्षा व्यावसायिकच होणार ‘गाईड’

By admin | Published: January 14, 2015 09:43 PM2015-01-14T21:43:03+5:302015-01-14T23:54:20+5:30

कोकण रेल्वे : सुरेश प्रभूंनी दिले होते आदेश

Rickshaw will go for commercial 'guide' | रिक्षा व्यावसायिकच होणार ‘गाईड’

रिक्षा व्यावसायिकच होणार ‘गाईड’

Next

रत्नागिरी : कोकणातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांना व्हावी, त्याचबरोबर पर्यटकांना इच्छित पर्यटन स्थळापर्यंत पोहोचता यावे, अशा दुहेरी हेतूने कोकण रेल्वे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी टुरिस्ट गाईड नेमण्याचे ठरविले आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या घोषणेनंतर कोकण रेल्वेने याकामी पुढाकार घेतला असून, स्थानिक रिक्षा व टॅक्सी व्यावसायिकांना यामध्ये संधी देण्याचा कोकण रेल्वे विचार करीत आहे.दूरवरुन आलेल्या पर्यटकांना स्थानिक परिसराची वा पर्यटन स्थळांची माहिती नसते. त्यामुळे ती माहिती मिळवून, इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत वेळ आणि पैसे दोन्ही खर्च होतात. त्यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ११ जानेवारीच्या कणकवली दौऱ्यात कोकण रेल्वेमार्गावरील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर टुरिस्ट गाईड नेमण्याची घोषणा केली होती.या घोषणेनंतर कोकण रेल्वेनेही टुरिस्ट गाईड नेमण्याच्या कार्याला गती दिली आहे. याकामी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य घेतले जाणार आहे. रिक्षा व टॅक्सी व्यावसायिकांना स्थानिक परिसराची मोठी माहिती असते. त्याचबरोबर त्यांचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय असल्याने, त्यांचे याकामी सहकार्य घेऊन त्यांना टुरिस्ट गाईड म्हणून नेमण्याचा कोकण रेल्वे महामंडळ विचार करीत आहे. यासाठी रिक्षा व टॅक्सी व्यावसायिकांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना दुहेरी फायदा होईल, असे कोकण रेल्वेचे म्हणणे आहे. अशा प्रकारचा प्रयोग कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर राबविण्यात आला असून, या ठिकाणी ७३ रिक्षा आणि टॅक्सी व्यावसायिक टुरिस्ट गाईड बनले आहेत. इच्छुक रिक्षा व टॅक्सी व्यावसायिकांना कोकण रेल्वे व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यांना ओळखपत्रही पुरविले जाणार आहे. सध्या रिक्षा व टॅक्सी व्यावसायिक केवळ प्रवाशांची ने-आण करणे एवढेच काम करतात. त्यांना टुरिस्ट गाईड म्हणूनही नेमणूक मिळाल्यास प्रवासी भाड्याबरोबरच टुरिस्ट गाईड म्हणून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. पर्यटकांच्या दृष्टीने टुरिस्ट गाईड व प्रवासी वाहतूक करणारा व्यावसायिक एकच असल्यास सोईस्कर होणार आहे. या दुहेरी हेतूने कोकण रेल्वे महामंडळ, पर्यटन विकास महामंडळ तसेच पर्यटकांचाही यामध्ये फायदा होणार असल्याने, ही योजना मोठ्या प्रमाणावर सफल होण्याची शक्यता आहे. सध्या टुरिस्ट गाईड नसल्याने, पर्यटकांना माहिती देणारे कोकणात कोणीच नसते. (प्रतिनिधी)


कोकण रेल्वे पर्यटन विकास महामंडळ देणार प्रशिक्षण.
कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकामध्ये सेवा सुरु होणार.
कणकवलीतील सुरेश प्रभूंच्या घोषणेची होणार अंमलबजावणी
टुरिस्ट गाईडना मिळणार स्वत:चे ओळखपत्र.
मडगावमध्ये ७३ रिक्षा आणि टॅक्सी व्यावसायिकांनी केली नोंदणी.

मडगाव येथे स्थानिक रिक्षा व टॅक्सी व्यावसायिकांनी टुरिस्ट गाईड म्हणून काम करण्यास पसंती दर्शविली असून, त्यांना केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत ओळखपत्र व प्रशिक्षण देण्यात आले.

Web Title: Rickshaw will go for commercial 'guide'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.